रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आपल्या कुटुंबासमवेत सुखरूप घरी पोहोचला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका अहमदाबादच्या बायो बबलमध्ये होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने (आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल) आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराट कोहली आपल्या घरी रवाना झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी यंदाचा हंगाम चांगला ठरला. या संघाने पहिल्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले होते. आयपीएल स्थगित होण्याची प्रक्रिया बंगळुरू आणि कोलकाता या संघात होणाऱ्या सामन्यापासून सुरू झाली. केकेआरचे दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यामुळे बंगळुरूविरुद्धचा सामना पुढे ढकलावा लागला. विराट आता काही दिवस घरी राहून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाबरोबर न्यूझीलंडला रवाना होईल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आयपीएलचा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आल्याने आता ऑक्टोबरमध्ये भारतातच होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतात त्यादरम्यानच्या काळात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत १६ संघांमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. परंतु भारतातील सद्य:स्थिती आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता अन्य संघ विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दर्शवण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेसुद्धा (बीसीसीआय) तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) जून महिन्यात होणाऱ्या बैठकीदरम्यान विश्वचषकाच्या यजमानपदाविषयीचा अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.