महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतला सध्या टीकेचा भडीमार सहन करावा लागतो आहे. विश्वचषकानंतर विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात पंतची फलंदाजीतली कामगिरी निराशाजनक होती. याचसोबत बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यातही पंतने यष्टीमांगे बऱ्याच चुका केल्या. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांच्या मते, ऋषभ पंत अजुनही लहान असून त्याला अनेक गोष्टी शिकणं गरजेचं असल्याचं जोन्स यांनी म्हटलं आहे.

“ऋषभ पंत अजुनही लहान आहे, तो बऱ्याच गोष्टी शिकणं गरजेचं आहे. अनेकदा आजुबाजूला काय घडतंय याचा त्याला अंदाज नसतो. सध्याच्या घडीला त्याला OFF साईडच्या फटक्यांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. माझ्यमते तो सध्या एककल्ली खेळ करतो”, डीन जोन्स एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

अवश्य वाचा – धोनी बनण्याचा प्रयत्न करु नकोस, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पंतला सल्ला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतही भारतीय संघाने पंतला विश्रांती देत साहाला संघात स्थान दिलं होतं. यष्टींमागे साहाने सर्वोत्तम कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली होती. मात्र बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या चुकीनंतरही रोहितने ऋषभची पाठराखण केली होती. त्यामुळे आगामी काळात ऋषभच्या खेळात कधी सुधारणा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader