पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट २०१०मध्ये झालेल्या स्पॉ़ट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर १० वर्षांची बंदीदेखील घालण्यात आली. पण भविष्यात तो आता अंपायर होऊ शकतो. पीसीबीने आयोजित केलेल्या ऑनलाईन लेव्हल-१ पंच अभ्यासक्रमामध्ये सलमान बट उपस्थित होता.

इंग्लंडमध्ये केली होती स्पॉट फिक्सिंग

ऑगस्ट २०१०मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत बुकी मजहर मजीद याच्यासह तीन क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केले होते. कसोटी सामन्यात कर्णधार सलमान बटच्या आदेशानुसार मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांनी नो-बॉल टाकला होता. या घटनेमुळे क्रिकेटविश्व  हादरले होते. दोषी आढळलेल्या खेळाडूंना तुरूंगात जावे लागले. बंदीनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मैदानात परतल्यानंतर निवृत्त झाला आहे, तर आसिफला अद्याप संधी मिळालेली नाही.

हेही वाचा – तब्बल सहा वर्षानंतर विम्बल्डन करतंय सचिन-विराटला ‘मिस’..! पाहा व्हिडिओ

बट अंपायर होणार हे समजताच चाहत्यांनी ‘अशा’ प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

 

पीसीबीने ७ ते २५ जून या कालावधीत आयोजित केलेल्या अंपायर व सामना अधिकाऱ्यांच्या कोर्समध्ये एकूण ३४६ जण उपस्थित होते. यामध्ये एकूण ४६ क्रिकेटपटू होते. सलमान बट व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे अब्दुल राऊफ, बिलाल आसिफ आणि शोएब खानदेखील सामील झाले. पीसीबी लेव्हल-१ पासून लेव्हल-३ पर्यंत अभ्यासक्रम घेणार आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.