भारताने वर्षाचा शेवट वेस्ट इंडिजविरूद्ध मालिका विजयाने केला. त्या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवन खेळू शकला नव्हता. पण दुखापतीनंतर दिल्ली रणजी संघात त्याने पुनरागमन केले. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने मंगळवारी स्वतःच्या मुलाबरोबर मजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धवन आपल्या मुलाबरोबर मस्ती करताना दिसला. शिखर धवन क्रिकेटपासून दूर असल्याने त्याच्या मुलाने त्याला काही प्रश्न विचारले आणि इतक्या दिवस सामना न खेळल्याबद्दल मुलाला लाथांनी तुडवले. मुलगा जोरावर शिखरला लाथा बुक्के मारताना दिसत आहे. तसेच जोरावर शिखरला विचारत आहे की तू इतक्यादिवस का खेळला नाही. तसेच नंतर त्याने शिखरची माफीही मागितली.

या व्हिडिओला कॅप्शन देताना शिखरने लिहिले की, “माझे मुख्य प्रशिक्षक मला खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात. पण गब्बरला फक्त छोटा गब्बरच मारू शकतो. झोरावर आणि माझी पत्नी मला भेटण्यासाठी आले आहेत. मी त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

धवनला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला २५ टाके घातले होते. पण आता तो तंदुरूस्त आहे. रणजी करंडक सामन्यात हैदराबादविरुद्ध तो दिल्लीचे नेतृत्व करत आहे. धवनसह वेगवान गोलंदाज इशांत शर्माही रणजी ट्राफी स्पर्धेत दिल्ली संघात आहेत. या सामन्यानंतर धवन श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहे.