भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड न झाल्यामुळे माजी संचालक रवी शास्त्री यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आपली नाराजी बोलून दाखविली. याशिवाय, आपल्या मुलाखतीच्यावेळी सौरव गांगुली हजर नसल्याबद्दलही शास्त्री यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कोलकाता येथे क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्य व माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी दहा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यामध्ये रवी शास्त्री यांचादेखील समावेश होता. संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान शास्त्री यांनी बँकॉकमधून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुलाखत दिली. व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि बीसीसीआयचे संयोजक अनिल जगदाळे ताज बंगाल हॉटेलमधून मुलाखतीला उपस्थित होते. तर सचिन तेंडुलकर लंडनमधून स्काईपद्वारे मुलाखतीत सहभागी झाला होता. मात्र, यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (कॅब) बैठकीत व्यग्र असलेला सौरव गांगुली मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहू शकला नव्हता. यावेळी गांगुलीला वारंवार फोन करण्यात आले. मात्र, त्याने फोनला प्रतिसाद दिला नाही. अखेर कॅबची बैठक संपवून गांगुली ६.३० वाजता बाहेर आला. यावेळी त्याने अनिल कुंबळे, प्रवीण अमरे आणि लालचंद राजपूत यांची प्रत्यक्ष मुलाखत झाल्याचे तर रवी शास्त्री यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुलाखत झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. शास्त्री यांनी या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या १८ महिन्यांत मी भारतीय संघासाठी मेहनत घेऊनही प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने मी निराश झाल्याचेही यावेळी रवी शास्त्री यांनी सांगितले.
कुंबळे भारताचे प्रशिक्षक