श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इसुरू उदानाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. त्याच्या निवृत्तीविषयी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.  २००९मध्ये पदार्पण केलेल्या उदानाने श्रीलंकेसाठी अनुक्रमे २१ वनडे आणि ३५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १८ आणि २७ बळी टिपले आहेत.

३३ वर्षीय उदाना अलीकडेच भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेचा एक भाग होता. ज्यात त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत एकही विकेट घेता आली नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर टी-२० विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत उदानाचे जाणे श्रीलंका संघासाठी मोठे नुकसान ठरू शकते.

 

हेही वाचा – पाकिस्तानचा ११० किलोचा फलंदाज रुग्णालयात, डोक्याला बसला जबर मार

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यापूर्वी उदानाला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही. श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. लंकेने मालिका २-१ने जिंकली आणि या विजयानंतर उदानाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.

विराटचा होता सहकारी

यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या मागील पर्वात उदाना विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा भाग होता. ५० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले आहे. त्याने सरासरी कामगिरी करत १० सामन्यात ८ बळी घेतले होते.