भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सुप्रीम कोर्टाने गुरूवारी झालेल्या सुनावणीत फटकारले आहे. अनुराग ठाकूर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) आज सुप्रीम कोर्टासमोर स्पष्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी खोटी साक्ष दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल, असे सुप्रीम कोर्टाने ठाकूर यांना फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे अनुराग ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

वाचा: लोढा समितीप्रकरणी बीसीसीआयला गावस्करांचा पाठिंबा

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष म्हणून आपण शशांक मनोहर यांचा सल्ला घेतल्याची अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात शपथपूर्वक खोटी माहिती दिल्याचे न्यायमित्रांनी सुप्रीम कोर्टापुढे स्पष्ट केले आहे. याशिवाय, अनुराग ठाकूर यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी मागणी देखील केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत ठाकूर यांना फटकारले असून वांरवार कोर्टाची दिशाभूक केल्याप्रकरणी खोटी साक्ष नोंदविल्याचे सिद्ध झाल्यास ठाकूर यांना तुरुंगवास भोगावा लागेल, असे सांगितले.

वाचा: लोढा आणि लोढणे

‘बीसीसीआय’च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन भारतीय क्रिकेटचा कारभार अन्य कुणा सक्षम अधिकाऱ्याच्या हातात द्यायचा की नाही, याचा निर्णय मात्र सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश दोन किंवा तीन जानेवारीला येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने ‘बीसीसीआय’ला प्रशासकीय पॅनेलसाठी नावं सुचवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला आहे. न्यायमित्रांनी त्यासाठी गृहविभागाचे माजी सचिव जी. के. पिल्ले, माजी कसोटीवीर मोहिंदर अमरनाथ आणि कॅगचे प्रतिनिधी विनोद राय यांची नावे सुचवली आहेत.