Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Aus : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारत विरूद्ध गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदाची लढत झाली. भारतीय संघाने महिला टी २० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला. या सामन्यात भारताचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौर हिच्यासाठी अंतिम सामना आणि आजचा दिवस हा ‘त्रिपल स्पेशल’ आहे.

काय आहेत तीन खास कारणं…

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासाठी आजचा दिवस तीन कारणांसाठी ‘स्पेशल’ आहे. पहिले कारण म्हणजे जागतिक महिला दिनी भारताच्या पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली. दुसरी बाब म्हणजे आजच्याच दिवशी २००९ साली तिने टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर तिसरे कारण म्हणजे आज हरमनप्रीतचा वाढदिवसदेखील आहे.

आव्हानांवर मात करत भारत अंतिम फेरीत

भारतीय संघाने टी २० विश्वचषक स्पर्धेतील चारही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. अटीतटीच्या सामन्यात दिप्ती शर्माने नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर पूनम यादवने मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाचे चार बळी टिपत भारताला १७ धावांनी विजय मिळवून दिला. दुसरा सामनादेखील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. शफालीची दणकेबाज खेळी आणि गोलंदाजी शिस्तबद्धचा याच्या बळावर भारताने १८ धावांनी विजय मिळवला.

भारताचा तिसरा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी रंगला. या सामन्यात भारताकडून शफाली वर्माने ४६ धावा केल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि भारताने सामना ३ धावांनी जिंकत आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर औपचारिकता म्हणून खेळण्यात आलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताला आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. या सामन्यातही शफालीने ४७ धावांची दमदार खेळी केली आणि भारताला साखळी फेरीत अजिंक्य ठेवले.

उपांत्य फेरीत पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे नियमानुसार साखळी फेरीत सर्वाधिक गुण असणाऱ्या भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळाले आणि इंग्लंडला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.