ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. रविवारी ऑलिम्पिक संपल्यानंतर पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे आता उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या टाटा मोटर्सने एक मोठी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे ही घोषणा पदक विजेत्यांसाठी नसून थोड्यात पदक हुकलेल्यांसाठी म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूंसाठी आहे. टाटा मोटर्स टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या पण थोड्यात पदक हुकलेल्यांना अल्ट्रोज ही महागडी गाडी भेट देणार आहे. या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं असून त्यांनी एक सुवर्ण दर्जाची कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली असल्याने त्यांच्या सन्मार्थ आम्ही ही छोटी भेट देत असल्याचं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?

“भारतामध्ये स्वत:ला घडवलेल्या आणि अंत्यत परिश्रमाने, मेहनतीने स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना धन्यवाद म्हणण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी आम्ही हे करत आहोत. या खेळाडूंना आम्ही आमची सर्वात प्रिमियम हॅचबॅक कार अल्ट्रोज गाडी भेट देणार आहोत. ही गाडी हाय स्ट्रीट गोल्ड रंगातील असून लवकरच ती खेळाडूंना भेट देण्यात येईल,” असं कंपनीने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

कंपनीच्या पॅसेंजर उद्योग विभागाचे प्रमुख असणाऱ्या शैलेश चंद्रा यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिलीय. “भारतासाठी ऑलिम्पिक हे केवळ मेडल आणि पोडियमवर उभं राहण्या पुरते मर्यादित नव्हतं. ते अनेकांसाठी त्याहून फार काही होतं. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा सन्मानं करताना आम्हाला आनंद होतं आहे. एवढ्या दबावाखाली खेळताना या खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. हे खेळाडू आपल्या कैशल्याच्या बळावर पोडियमच्या म्हणजेच मेडलच्या फार जवळ पोहचले होते,” अशा शब्दांमध्ये शैलेश यांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आणि सुपरस्टार रजनीकांतमधील कनेक्शन माहितीये का?

पुढे बोलताना शैलेश यांनी या खेळाडूंना पदकाने हुलकावणी दिली असली तर त्यांनी कोट्यावधी भारतीयांची मनं जिंकली आहेत. आपल्या ध्येवादाच्या जोरावर या खेळाडूंनी भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केलं असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळालीय. “देशामध्येच मोठी झालेली वाहन कंपनी या नात्याने आम्हाला या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. या खेळाडूंनी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दाखवली. टाटा मोर्टर्सची हीच संस्कृती आहे. टाटा मोटर्सच्या अल्ट्रोजने सुरक्षा, डिझाइन आणि कामगिरीमध्ये गोल्डन दर्जा मिळवला आहे, त्यामुळेच आम्ही ही गाडी त्यांना भेट देत आहोत,” असं शैलेश यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय”; Viral झाला मोदींच्या आवाजातील श्याम रंगीलाचा व्हिडीओ

टाटा मोटर्सने नक्की किती खेळाडूंना गाड्या देणार याची यादी जाहीर केली नसली तरी किमान १५ ते जास्तीत जास्त २० खेळाडूंना या गाड्या दिल्या जाऊ शकतात. यामध्ये गोल्फर अदिती अशोक, कुस्तीपटू दिपक पुनिया आणि भारतीय महिला हॉकी संघाचा समावेश आहे. हॉ़की संघाच्या ११ खेळाडू आणि राखीव खेळाडू असं पकडलं तर २० जणांच्या चमूला प्रत्येकी एक अशा एकूण २० गाड्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. अल्ट्रोज गाडीची किंमत सहा लाखांपासून साडेनऊ लाखांपर्यंत आहे.