२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. धोनी आपली निवृत्ती घोषित करणार अशा चर्चा सुरु असतानाही धोनीने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेत, निवृत्तीच्या चर्चांवर काहीकाळ पडदा टाकला. भारतीय संघातून सध्या बाहेर फेकला गेलेल्या मनोज तिवारीने धोनीच्या निवृत्तीबद्दल आपली कठोर प्रतिक्रीया दिली आहे. भारतीय संघ ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असं म्हणत मनोज तिवारीने धोनीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे.

“धोनीने आतापर्यंत आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. भारतीय संघाला सर्वोत्तम बनवण्यामध्येही त्याचं योगदान आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरनेही धोनीने आता विश्रांती घ्यायला हवी असं म्हटलं होतं. विराट कोहलीने जरी धोनीची भारतीय संघाला गरज आहे असं म्हटलं असलं तरीही निवड समितीला आता कठोर निर्णय घ्यावा लागेल. हिंमत दाखवून आता योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे.” Indian Express ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज बोलत होता.

धोनीच्या कामगिरीमध्येही आता कमालीची घसरण झाली आहे, आणि हे एका किंवा दोन सामन्यांमध्ये होतंय अशातला भाग नाहीये. जे खेळाडू चांगली कामगिरी करतील ते संघात राहतील, ज्यांची कामगिरी खराब असेल त्यांना आपली जागा गमवावी लागेल. धोनीला कोणत्या आधारावर निवड समिती संघात स्थान देतेय हे माहिती नाही. देशात अजुनही गुणवान खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. भारतीय संघ ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाहीये, आपण देशासाठी खेळतोय ही भावना कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मनोज तिवारीने धोनीच्या निवृत्तीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

गेली काही वर्ष मनोज तिवारीला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाहीये. मध्यंतरी दुलीप करंडकासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली, यामध्येही मनोज तिवारीला वगळण्यात आलं. याबद्दल मनोजने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.