भारतीय संघाने महिला टी २० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. या आधी २०१८ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभूत केले होते. आज T20 World Cup 2020 मध्ये भारताचा अंतिम सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चुरशीच्या सामन्यात मात दिली होती, त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयी लय कायम राखतो की यजमान पराभवाचा बदला घेतात? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाहूया टीम इंडियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास…

भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

भारतीय संघाने टी २० विश्वचषक स्पर्धेतील चारही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. अटीतटीच्या सामन्यात दिप्ती शर्माने नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर पूनम यादवने मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाचे चार बळी टिपत भारताला १७ धावांनी विजय मिळवून दिला. दुसरा सामनादेखील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. शफालीची दणकेबाज खेळी आणि गोलंदाजी शिस्तबद्धचा याच्या बळावर भारताने १८ धावांनी विजय मिळवला.

भारताचा तिसरा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी रंगला. या सामन्यात भारताकडून शफाली वर्माने ४६ धावा केल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि भारताने सामना ३ धावांनी जिंकत आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर औपचारिकता म्हणून खेळण्यात आलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताला आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. या सामन्यातही शफालीने ४७ धावांची दमदार खेळी केली आणि भारताला साखळी फेरीत अजिंक्य ठेवले.

उपांत्य फेरीत पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे नियमानुसार साखळी फेरीत सर्वाधिक गुण असणाऱ्या भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळाले आणि इंग्लंडला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

Story img Loader