इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. दोनच दिवसात विजय मिळवण्याची हा भारतीय संघाची दुसरी वेळ ठरली.

भारती संघाने दोन दिवसात कसोटी सामना जिंकला. त्यामुळे अनेक चाहते आनंदी झाले. पण काही चाहते आणि इंग्लंडचे माजी खेळाडू यांनी मात्र खेळपट्टीच्या स्तरावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे दोन दिवसांत निकाल लागलेले कसोटी सामने ही चर्चा रंगली. आकडेवारीचा विचार केल्यास आशिया खंडात एकूण तीन वेळा दोन दिवसात कसोटीचा निकाल लागला. २००२-०३ साली शारजाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सामना जिंकला होता. त्यानंतर २०१८ साली भारताने बंगळुरूच्या मैदानावर अफगाणिस्तानच्या संघाचा दोन दिवसात निकाल लावला होता. तर आज दुसऱ्यांदा भारताने दोन दिवसात सामना जिंकला.

याशिवाय, चेंडूच्या बाबतीत हा सर्वात कमी काळ चाललेला कसोटी सामना ठरला. आजच्या कसोटीत एकूण चारही डावात मिळून ८४२ चेंडू टाकण्यात आले. त्याआधी १९४५-४६मध्ये वेलिंग्टनमधील कसोटी सामना ८७२ चेंडूंपर्यंत रंगला होता. नंतर १९९९-२००० साली सेंच्युरियनच्या मैदानवरील कसोटी ८८३ चेंडूत संपली होती. तर शारजाच्या मैदानातील २००२-०३ची कसोटी केवळ ८९३ चेंडूंच्या खेळासह संपुष्टात आली.

अशी रंगली तिसरी कसोटी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.