जगातील सर्वात शक्तिशाली महिला टेनिसपटू असलेली अमेरिकेची सेरेना विल्यम्स यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पहिल्या फेरीतच दुखापतीमुळे तिला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. पहिल्या फेरीत सेरेनाचा सामना बेलारूसच्या अलिआक्सांद्रा सास्नोविचशी झाला. दोघांच्या दरम्यानचा पहिला सेट ३-३ असा बरोबरीत सुटला, तेव्हा सेरेना घसरली आणि तिच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिचे आठवे विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

प्रेक्षकांसमोर रडली सेरेना

सेरेना विल्यम्सने तिच्या २३ ग्रँडस्लॅम जेतेपदापैकी सात विजेतेपदे विम्बल्डनमध्ये पटकावली आहेत. त्यामुळे यंदा तिला मोठा विक्रम करण्याची संधी होती, मात्र पहिल्या फेरीतच ती बाद झाली. या घटनेमुळे सेरेना प्रेक्षकांसमोर ढसाढसा रडली. प्रेक्षकांनीही उभे राहून टाळ्या वाजवत तिच्या जिद्दीला दाद दिली. सेरेनाचा हा भावनिक व्हिडिओ विम्बल्डनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही शेअर केला गेला आहे.

या घटनेनंतर टेनिस चाहते सेरेनाला पुनरागमनासाठी शुभेच्छा देत आहेत. ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीतून सेरेना दुसऱ्यांदा बाहेर पडली आहे. याआधी २०१२मध्ये, तिला फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. व्हर्जिनी रॅझॉनविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Wimbledon (@wimbledon)

हेही वाचा – करोनामुळं ‘राजा’माणूस गेला..! डिव्हिलियर्ससोबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट हळहळलं

ग्रँडस्लॅम स्पर्धेत सामन्यातून माघार घ्यायला भाग पडण्याची सेरेनाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९९८मध्येही तिला ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सेरेना म्हणाली, ”आज सामन्यातून माघार घेतल्यामुळे माझे मन तुटले आहे. मी जेव्हा कोर्टात गेली आणि बाहेर पडली, तेव्हा मला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.”