सोशल मीडियावर सध्या #10YearsChallenge जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर करायचा आहे. दहा वर्षापूर्वी आणि आताचा फोटो पोस्ट करून प्रत्येकजण तुलना करत आहे. या चॅलेंजमुळे दशकभरात झालेला आपल्यातील बदल दिसून येतो. हेच #10YearsChallenge विराट कोहलीवर लागू केले. त्यावरून विराट कोहलीकडून आपल्याला प्रेरणा घेण्याची आणि शिकण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. कारण कोहलीने दहा वर्षात फक्त आपल्यातच नव्हे तर भारतीय क्रिकेटमध्येही अमुलाग्र बदल घडवला आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक बदल झाला आहे. मैदानावर आक्रमक आणि रागीट स्वभावाचा विराट आता शांतपणे निर्णय घेताना आपल्याला दिसतो. विराट कोहलीची धावांची भूक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. तो लवकरच १९,००० हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण करेल. ५६.५९ च्या सरासरीने धावा काढणारा सध्याच्या घडीला विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. विराटच्या नावावर सध्या ६४ शतके आहेत. एकदिवसीय सामन्यात ३९ शतके केली आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक शतके असणारा दुसरा फलंदाज आहे. याच वेगाने शतके केली तर लवकरच सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. अपयशातून कसं शिकाव याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोहली होय.

ICC पुरस्कारावर निर्विवाद वर्चस्व
विराट कोहली दिवसोंदिवस नवनव्या विक्रमांचे इमले रचत आहे. २०१८ सालच्या आयसीसी पुरस्कारांवर कोहलीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे तिन्ही पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. एकाच वर्षात आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोहलीने आपला ठसा उमटवला आहे. आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाच्या कर्णधारपदीही विराट कोहलीची वर्णी लागली आहे.

२००८ मध्ये पदार्पण –
१८ ऑगस्ट २००८ रोजी विराट कोहलीने श्रीलंकाविरोधात भारतीय संघात पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात विराट कोहलीला अपयशाला सामोरं जावं लागले होते. गौतम गंभीरसोबत सलामीला खेळताना कोहली फक्त १२ धावांवर बाद झाला होता.

२००९ –
गौतम गंभीर जखमी झाल्यामुळे २००९ मध्ये विराट कोहलीसाठी भारतीय संघातील दारे पुन्हा एकदा उघडली गेली. विराटने या संधीचे सोनं केलं. विराट कोहलीने दबाव असतानाही ७९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर विराट कोहलीमध्ये आत्मविश्वास वाढला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने आफ्रिकेविरोधात शतकी खेळी करत संघातील जागा पक्की केली. या शतकी खेळीनंतर भारताच्या विराट युगाला सुरूवात झाली.

२०१० –
विराट कोहलीने संघातील आपली जागा पक्की केली होती. २०१० मध्ये विराट कोहलीने ३ शतके झळकावत आपली उपयोगिता दाखवून दिली. प्रेक्षकांचे आता चाहत्यांमध्ये रूपांतर होत होते. सचिन-धोनी-युवराज-सेहवाग यासारख्या दिग्गांजाच्या सानिध्यात विराट कोहली आपल्यामधील प्रतिभा वाढवत होता. दिग्गजांच्या उपस्थित २०१० मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम कोहलीने करून दाखवला.

२०११ –
हे वर्ष विराट कोहलीसाठी खास ठरलं. विश्वचषकात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी तर मिळालीच शिवाय कसोटीमध्ये भारतीय संघाकडून पदार्पणही केले. २०११ या वर्षभरात विराट कोहली जगातील सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू होता. CEAT International Cricketer of the Year या पुरस्काराने गौरवण्यात आले.

२०१२ –
वर्षभरात विराट कोहलीनने सहा शतके झळकावली. यामध्ये चार एकदिवसीय आणि दोन कसोटी शतकांचा समावेश आहे. २०१२ मध्ये विराट कोहली भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. यावर्षी विराट कोहलीचा सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने गौरव केला.

२०१३
विराट कोहली संघातील सिनियर खेळाडू झाला होता. मधल्या फळीमध्ये विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू राहिला नाही. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांमध्ये विराट कोहली नावाची दहशत निर्माण झाली. यावर्षी भारत सरकारने विराट कोहलीला आर्जुन पुरस्काराने गौरवले. यावर्षी पुन्हा विराट कोहलीचा सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने गौरव केला.

२०१४ –
यावर्षाखेरीस विराट कोहलीला भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत ४ शतके झळकावात दिग्गजांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. यावर्षी विराट कोहलीचा सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने गौरव केला. जाहिरातीदरम्यान बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माशी ओळख झाली. तेव्हापासून दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगण्यास सुरूवात झाली.

२०१५ –
हे वर्ष विराट कोहलीसाठी निराशादायक ठरलं. विराट कोहलीला अपयशानं ग्रासलं. इंग्लंड दौऱ्यातील अपयश, अनुष्का शर्मासोबतच्या अफेअयरच्या चर्चा आणि मैदानावरील आक्रमकता यामुळे विराट मानसिक तणावात गेला. अपयशातून शिकला नाही तर तो मोठा खेळाडू कसा? विराट कोहलीने आपल्या चुका समजून सुधारणा केली.

२०१६ –

गतवर्षीच्या अपयशावर मात करत विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला. यावर्षी विराट कोहलीने कसोटीमधील पहिले द्विशतक झळकावले. वर्षाच्या अखेरीपर्यंत कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नावावर दोन द्विशतके होती. Wisden Leading Cricketer in the World, पॉली उम्रगर पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं.

२०१७
हे वर्ष विराट कोहलीसाठी थोडं जास्तच खास राहिले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोहलीने धावांचा पाऊस पाडला. विक्रमांचे नवे इमले उभे केले. वर्षाच्या अखेरीस प्रेयसी अनुष्कासोबत विवाहबंधनात अडकला. भारत सरकारने यावर्षी विराट कोहलीला पद्मश्री पुरस्काराने गौरवले. यावर्षी विराट कोहलीला आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधापदी नियुक्त करण्यात आले.

२०१८ – २०१९
विराट कोहलीने यावर्षभरात अनेक मोठ्या खेळी केल्या. संघाला एकहाती विजय मिळवून दिले. कर्णधार म्हणून परिपक्व झाला. युवा आणि संघातील खेळाडूंसाठी एक आदर्श म्हणून विराट कोहलीचे नाव चर्चेत राहू लागले. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजयाने विराटचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले. वर्षभरात त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रमही कोहलीने आपल्या नावे केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये होणाऱ्या विश्वचषकात विराट कोहली आपली छाप कशी सोडतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.