टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताचा ‘पदकदुष्काळ’ सुरु होता. मात्र शुक्रवारी सातव्या दिवशी बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने पदक निश्चित केलं. महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तिने पदकाची निश्चिती करीत भारतीयांना सुखद धक्का दिला. लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले. लव्हलिना आसाममधील बरोमुखिया गावात राहणारी आहे. आसाममध्ये पहिल्यांदाच लव्हलिनाच्या माध्यमातून पदक येणार आहे. पदक निश्चितीनंतर आसाम सरकार कामाला लागलं आहे. लव्हलिनाच्या घराजवळ जाणारा कच्चा मार्ग व्यवस्थित करण्याचं काम सुरु झालं आहे. मुसळधार पावसामुळे तिच्या घराजवळ जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. राज्याचं बांधकाम विभाग हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी कामाला लागलं आहे.

“या वर्षी आमच्या भागात दुष्काळ पडला आहे . मात्र लव्हलिनाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि तिच्या घराजवळ जाणारा मार्ग चिखलमय झाला आहे. मी या संदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या बोललो आणि रस्ता व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला. लव्हलिना टोक्योतून पदक जिंकून येईपर्यंत रस्ता दुरूस्त होईल. पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पक्का केला जाईल” , असं भाजपा आमदार बिस्वजीत फुकान यांनी सांगितलं.

आसामची २३ वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिनाने उपांत्यपूर्व सामन्यात चेनचा ४-१ असा पराभव केला. ४ जुलैला होणाऱ्या उपांत्य सामन्यात तिची टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी गाठ पडणार आहे. बुसेनाझने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या अ‍ॅन लायसेन्कोला हरवले.

VIDEO : हे वागणं बरं नव्हं…! भडकलेल्या जोकोव्हिचनं ऑलिम्पिकमध्ये केलं चुकीचं वर्तन

लव्हलिनाच्या वडीलांचा छोटासा व्यवसाय आहे. बहीण किक बॉक्सिंगपटू आहे. तिच्याचमुळे लव्हलिनाने किक बॉक्सिंग खेळायला प्रारंभ केला. भारतीय क्रीडा प्राधिकरणामधील राष्ट्रीय प्रशिक्षक पॅडूम बोरो यांनी तिला बॉक्सिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. २०१८च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत तिने पदार्पणातच कांस्यपदक पटकावले, मग पुढील वर्षी आणखी एक कांस्यपदक मिळवले. याशिवाय दोन आशियाई अजिंक्यपद स्पर्धामधील कांस्यपदकेही तिने पटकावली आहेत.