टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आले. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. टोक्योमधील संघाच्या यशस्वी प्रवासात भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. मात्र हे योगदान आता मरिन यांचे भारतीय संघासाठी शेवटचे योगदान ठरले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यानंतर शोर्ड मरिन यांनी भारतीय संघाला अलविदा म्हटले.

ऑलिम्पिकमध्ये मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. सामन्यानंतर मरिन म्हणाले, ”सध्या माझी कोणतीही योजना नाही, कारण हा माझा भारतीय महिला संघासोबतचा शेवटचा सामना होता.” मरिन आणि संघाचे विश्लेषणात्मक प्रशिक्षक जनेका शॉपमन दोघांनाही भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) मुदतवाढीची ऑफर दिली होती, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ही ऑफर नाकारली.

हेही वाचा – हॉकी संघाशी बोलताना ‘ते’ वाक्य ऐकताच पंतप्रधान मोदी म्हणाले “अरे बापरे…”

‘त्या’ सेल्फीमुळे चर्चेत आले मरिन

भारतीय महिला संघाने २ ऑगस्ट रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारल्यानंतर शोर्ड मरिन यांना अश्रू अनावर झाले होते. ते मैदानातच रडू लागले. त्यानंतर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. मात्र नंतर शोर्ड यांनीच भारतीय महिला संघासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. त्यांनी या फोटोला एक मजेदार कॅप्शनही दिली होती. “कुटुंबीयांनो मला माफ करा, घरी येण्यासाठी मला आणखीन काही कालावधी लागेल,” अशा कॅप्शनसहीत शोर्ड मरिन यांनी भारतीय महिला संघासोबतचा सेल्फी पोस्ट केला होता. म्हणजेच आता भारतीय महिला संघ पुढील फेरीत गेल्याने आपल्याला आणखीन काही काळ संघासोबत थांबावे लागणार असल्याचे शोर्ड यांनी मजेदार पद्धतीने सांगितले होते. त्यानंतर मरिन चर्चेत आले.

कोण आहेत शोर्ड मरिन?

शोर्ड मरिन हे मूळचे नेदरलँड्सचे आहेत. शोर्ड हे २००३ पासून वेगवेगळ्या संघांना हॉकीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांना कोच म्हणून १८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून म्हणजेच २०१८ च्या मध्यापासून ते भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. २०१७ ते २०१८ दरम्यान शोर्ड मरिन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.