टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिलं पदक मिळून दिले. यानंतर संपूर्ण देशातून मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. यावेळी मीराबाईने कानात घातलेल्या ऑलिम्पिक रिंगसारखी कर्णफुलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही कर्णफुले मीराबाईच्या आईने पाच वर्षापूर्वी दागिने विकून तिच्यासाठी केले होते. या कर्णफुलांनी तिचं नशीब चमकेल असा विश्वास तिच्या आईला होता. मात्र रियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई पदक मिळवण्यात अपयशी ठरली होती. आता टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत रजत पदक पटकावलं. तिच्या या कामगिरीनंतर तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांना आनंदाने रडू आलं.

“मी तिची कर्णफुले टीव्हीवर बघितली होती. २०१६ रियो ऑलिम्पिकपूर्वी दिली होती. माझ्याजवळील सोनं आणि बचत मोडून मी ती केली होती. यामुळे नशीब चमकेल आणि तिला यश मिळेल असं मला वाटत होतं”, असं लीमा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. मीराबाईंनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर तिच्या घरी उपस्थित असलेल्या नातेवाईक आणि मित्रांनी एकच जल्लोष केला.

मीराबाईचा संघर्ष

कनिष्ठ गटातील मीराच्या व्यावसायिक कारकीर्दीला जेव्हा प्रारंभ झाला, तेव्हा तिच्यापुढे अनंत अडचणी होत्या. तिचे प्रशिक्षक तिला आहाराचा तक्ता द्यायचे. त्यात चिकन आणि दूध हे महत्त्वाचे घटक असायचे. मात्र त्या तक्त्याला न्याय देऊ शकणारी आर्थिक पुंजी तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती; परंतु तिने हिमतीने अशा अनेक अडचणींवर मात केली. २०१३ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला सर्वोत्तम लिफ्टर हा मान मिळाला. २०११च्या आंतरराष्ट्रीय युवा अिजक्यपद स्पर्धेत आणि कनिष्ठ गटाच्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या याच कामगिरीमुळे ती भारताचे भविष्य असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्राला मिळाली होती.