शेक्सपिअरने नावात काय आहे, असे म्हटले होते. पण आता एका गोष्टीमुळे नावातच सर्व काही आहे, असे तु्म्हाला वाटू शकते. भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आता त्याच्या नावाच्या लोकांना लाभ मिळणार आहे. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील नेत्रंग या छोट्या शहराच्या एका पेट्रोल पंपाच्या मालकाने एका वेगळ्या पद्धतीने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोफत पेट्रोल

या पेट्रोल पंप मालकाने रविवारी त्याच्या पंपावर एक बोर्ड लावला. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल मिळेल, असे बोर्डावर लिहिण्यात आले आहे. एसपी पेट्रोलियमच्या मालकाने सांगितले, की ही ऑफर नीरज चोप्राच्या विजयाच्या सन्मानार्थ देण्यात आली आहे. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवून मोफत पेट्रोल मिळत आहे. एवढेच नव्हे, तर मालकाने त्याच्या पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नीरज नावाच्या व्यक्तींचे मनापासून स्वागत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

गिरनार रोप-वेवर मोफत फिरायची संधी

नीरज नावाच्या लोकांना भरूचमध्ये मोफत पेट्रोल मिळत असेल, तर जुनागढमध्येही ऑलिम्पियनच्या सन्मानार्थ अशीच ऑफर देण्यात आली आहे. या अंतर्गत नीरज नावाच्या लोकांना गिरनार रोप-वेवर मोफत फिरायची संधी मिळत आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भावनेला सलाम करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही ऑफर दिली आहे. २० ऑगस्टपर्यंत ही ऑफर सुरू आहे.

 

तब्बल १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.