नवी दिल्ली : कोटय़वधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मिराबाई चानूचे सोमवारी जल्लोषात मायदेशी स्वागत करण्यात आले. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर मिराबाईचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडवून तुफान गर्दी केली होती.

मणिपूरच्या २६ वर्षीय चानूने शनिवारी महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकावर नाव कोरून भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदकांचे खाते उघडले. ‘ऑलिम्पिक पदकासह भारतात परतल्यामुळे मी फार आनंदित आहे. तुम्ही सर्वाकडून लाभलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद!’ असे ‘ट्वीट’ मिराबाईने मायदेशी परतल्यावर केले. मिराबाईच्या स्वागतावेळी विमानतळाबाहेरील चाहत्यांनी ‘भारतमाता की जय, देशाची शान मिराबाई चानू’ अशा घोषणा दिल्या. या वेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणचे सदस्य, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर, रात्री उशिरा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला किरेन रिजिजू आणि सर्बनंदा सोनोवाल हे केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नेमणूक

’  ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नेमणूक करण्यात आली असून तिला राज्य शासनाकडून तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी याविषयी अधिकृतरीत्या घोषणा करतानाच मिराबाईचे कौतुकही केले.

पिझ्झावर ताव मारला!

’  दोन दिवसांपूर्वी रौप्यपदक मिळाल्यानंतर मिराबाईने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर रविवारी तिला पिझ्झावर ताव मारण्याची संधी मिळाली. ‘‘पिझ्झा माझ्या आवडीचा आहे. ऑलिम्पिकनगरीत दाखल झाल्यापासून येथे पिझ्झा मिळत असल्याचे मला समजले. त्यामुळे आता पदकाचा आनंद पिझ्झा खाऊन करणार आहे,’’ असे मिराबाई म्हणाली होती.

पहिल्या दिवशी, पहिले पदक, हे यश कुणीच मिळवले नव्हते. १३५ कोटी भारतीयांच्या चेहऱ्यावर तू आनंद फुलवलास. सर्व देशवासियांना तुझा अभिमान आहे.

अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री