श्रीलंकेचे क्रिकेटपटू कुसल मेंडिस, धनुष्का गुणाथिलाका आणि निरोशन डिकवेला यांना गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात बायो-बबल उल्लंघनासाठी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानंतर, आता एक नवीन बातमी समोर आली आहे. या खेळाडूंनी श्रीलंका सोडून अमेरिकेत कराराच्या आधारावर खेळण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे त्यांना वार्षिक १२५००० अमेरिकन डॉलर्स मिळतील.

या तीन श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंपैकी दोन अमेरिकेत जाण्याची आणि पुन्हा कारकीर्द सुरू करण्याची तयारी करत आहेत. द संडे मॉर्निंग स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या तीनपैकी एका क्रिकेटपटूने गेल्या आठवड्यातच आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला होता, तर त्या त्रिकुटातील आणखी एका सदस्याने आता हाच निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले आहे की अमेरिकेत तीन वर्ष क्रिकेट खेळताना हे खेळाडू वार्षिक १२५००० अमेरिकन डॉलर्स कमवतील. श्रीलंकेच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने या दोन खेळाडूंच्या निर्णयाचे समर्थन केल्याचेही समोर आले आहे.

बंदी घातलेल्या तीन श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंपैकी दोन अमेरिकेत व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे त्यांच्या देशातून पहिले नसतील. याआधी शेहान जयसूर्या अलीकडेच श्रीलंका सोडून अमेरिकेत गेला, जिथे त्याने एलए ओपन टी-२० चॅम्पियनशिप २०२१ मध्ये भाग घेतला. श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज दिलहारा फर्नांडोसुद्धा त्या स्पर्धेत खेळला होता. याशिवाय, भारतीय वेगवान गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदीसुद्धा या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत गेला. २०१३मध्ये बीसीसीआयने सिद्धार्थवर बंदी घातली होती.

हेही वाचा – ICC टी-२० वर्ल्डकपसाठी जगज्जेत्या संघाची घोषणा; ‘दोन’ महत्त्वाचे खेळाडू बाहेर!

अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. इंग्लंडमध्ये बायो बबल उल्लंघनासाठी गेल्या महिन्यात चौकशी समितीने त्याला दोषी ठरवले होते. इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान या खेळाडूंनी बायो बबलचे नियम मोडले होते. शिक्षा म्हणून त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली.