ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे बुधवारी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कस्तुरीरंगन हे माजी क्रिकेटपटू होतेच पण त्याचसोबत एक उत्तम प्रशासक आणि बीसीसीआय क्यूरेटरही होते. “कस्तुरीरंगन यांचे आज सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन चमारजापेट येथील निवासस्थानी झाले,” अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष आणि प्रवक्ते विनया मृत्युंजय यांनी पीटीआयला दिली.
१९४८ ते १९६३ या काळात कस्तुरीरंगन यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून रणजी करंडकामध्ये म्हैसूर संघातर्फे आपली कारकिर्द घडवली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत प्रख्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी ट्विट केले, “जी कस्तुरीरंगन यांचे निधन झाल्याचे ऐकून वाईट वाटले. क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.”
Sad to hear about the passing of G Kasturirangan. He will be fondly remembered for all his contributions to cricket. Heartfelt condolences to his family.
— Anil Kumble (@anilkumble1074) August 19, 2020
“अध्यक्ष, सचिव आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (KSCA)च्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, माजी रणजी खेळाडू, KSCAचे उपाध्यक्ष आणि बीसीसीआय क्युरेटर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल संघटना मनापासून खेद व्यक्त करते आहे”, असे KSCAच्या शोक संदेशात नमूद करण्यात आले आहे.
कस्तुरीरंगन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर तत्कालीन म्हैसूर राज्यासाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. कस्तुरीरंगन यांनी म्हैसूरकडून ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९४ बळी मिळवले. १९५२मध्ये भारतीय संघात वेस्ट इंडीज दौर्यासाठी त्यांना निवडण्यात आले होते, पण वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्यास नकार दिला. कस्तुरीरंगन यांनी निवृत्तीनंतर क्यूरेटर म्हणून नाव कमावले. बीसीसीआयच्या ग्राऊंड आणि विकेट्स कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कस्तुरीरंगन यांचा मुलगा के. श्रीराम हेदेखील सध्या बीसीसीआय क्यूरेटर आहेत.