भारतीय संघ १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतात होणारी ही मालिका ३ सामन्यांची असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा क्रिकेट मालिका रंगते, तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीबाबत बरीच चर्चा होते. सध्यादेखील विराटच्या फलंदाजीबाबत आणि त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत तसेच संघातील सलामीवीराच्या निवडीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. या साऱ्या प्रश्नांची विराटने सूचक उत्तरे दिली आहेत.

धवन की राहुल… संघात स्थान कोणाला?

जो खेळाडू चांगल्या लयीत असेल तो नेहमी संघाला हवाहवासा असतो. त्याची उपयुक्तता साऱ्यांनाच माहिती असती. तुमच्या संघात तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू हवे असतात. ते खेळाडू अंतिम झाले की मग त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचं काम केलं जातं. सध्याचा फॉर्म पाहता रोहित, शिखर आणि राहुल हे तिघेही संघात एकाच वेळी खेळू शकतात. मैदानावरील खेळात आम्हाला कसा समतोल साधायचा आहे त्यावर सगळं अवलंबून आहे, असे उत्तर कोहलीने दिले.

फलंदाजीचा क्रमांक बदलण्याचे संकेत

“मी फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकाऐवजी खालच्या क्रमांकावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालं तर मला त्याचा आनंदच असेल. मी कोणत्या क्रमांकावर खेळतो याबाबत मी फारसा आग्रही नाही. माझ्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत माझ्या मनात अजिबातच असुरक्षिततेची भावना नाही. त्यामुळे माझ्या फलंदाजीच्या क्रमांकात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही”, असे कोहली म्हणाला.

मालिकेचे वेळापत्रक

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.