भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २००८मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीने टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली. आज कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक २००७, एकदिवसीय विश्वचषक २०११ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ या स्पर्धा नावावर केल्या आहेत. आयसीसीच्या तीन वेगवेगळ्या स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. याच कारणास्तव लोक अनेकदा धोनी आणि कोहलीच्या कर्णधारपदाची तुलना करतात. मात्र, विराटने फक्त दोन शब्दात आपल्या आणि धोनीच्या संबंधाचे वर्णन केले आहे.

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सनं IPLचं केलं ‘भन्नाट’ पद्धतीनं स्वागत, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

‘विश्वास’ आणि ‘आदर’ या आधारे कोहलीने आपले धोनीबरोबरचे आपले नाते असल्याचे सांगितले. विराट कोहलीला इंस्टाग्रामवर धोनीशी असलेले आपले संबंध दोन शब्दांत सांगण्यासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. यावर विराटने हे उत्तर दिले. विराटने धोनीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी रवीचंद्रन अश्विनबरोबर इन्स्टाग्राम संवादादरम्यान कोहलीने धोनीचे कौतुक केले होते. ”राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्यात माहीची मोठी भूमिका होती”, असे विराटने म्हटले होते. २०१४मध्ये धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अचानक कसोटी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर कोहलीला कर्णधार बनवण्यात आले.

हेही वाचा – मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा भीमपराक्रम!

कसोटीत धोनीपेक्षा विराट सरस

विराट कोहली आणि धोनी या दोघांनीही ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वात ३६ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या नेतृत्वात संघाने २७ सामने जिंकले आहेत. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केला, तर धोनी पुढे आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. विराटने २०० सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. यात त्याला १२८ सामन्यात विजय मिळवता आला आहे.