भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पालकत्व रजा घेऊन विराट भारतात परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राखला. आता इंग्लंड-भारत कसोटी मालिकेसाठी विराट कर्णधार म्हणून पुन्हा संघात येत आहे. तर अजिंक्य उपकर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलियातील यशानंतर विराट आणि अजिंक्य यांच्यातील नात्यात काही बदल होणार का? याबद्दल अजिंक्यला पीटीआयकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजिंक्यने अतिशय स्पष्ट उत्तर दिले.

ICC World Test Championship: अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर

“विराट संघात आल्यावर तो कर्णधार असेल आणि मी उपकर्णधार असेन. पण आमच्यातील नातं अजिबात बदलणार नाही. तो कायमच आमच्या संघाचा कर्णधार होता आणि यापुढेही राहिल. तो संघात नसताना कर्णधारपदाची सुत्रे मला सांभाळावी लागतात आणि ती जबाबदारी मी सर्वोत्तम प्रकारे पार पाडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. संघाचा कर्णधार कोण आहे याचा फारसा फरक पडत नाही. कर्णधार असलेला खेळाडू आपली भूमिका कशी पार पाडतो हे महत्त्वाचे आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी नक्कीच संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करेन”, असं अजिंक्य म्हणाला.

IND vs ENG: कसोटी मालिकेआधी दिग्गज क्रिकेटपटूचा इंग्लंडच्या फिरकीपटूंना इशारा

पुढे अजिंक्य म्हणाला, “मी आणि विराट खूप चांगले मित्र आहोत. त्याने नेहमी माझ्या खेळाचं कौतुक केलं आहे. भारतीय संघासाठी आम्ही दोघांनीही भारतात व भारताबाहेर काही महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. विराट चौथ्या आणि मी पाचव्या क्रमांकावर खेळत असल्याने आमच्यात चांगली भागीदारी होते. आम्ही एकमेकांच्या खेळाला पाठींबा देत असतो. आम्ही दोघं क्रीजवर असतो तेव्हा आमच्यात नेहमीच चांगला संवाद होतो. इतकंच नव्हे आमच्यापैकी कोणी एखादा चुकीचा फटका खेळला तर दुसरा लगेच त्याला ती चूक लक्षात आणून देतो.”

Video: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्…

“विराट खूपच तल्लख बुद्धिमत्ता असलेला कर्णधार आहे. मैदानावर झटपट निर्णय घेण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. जेव्हा फिरकीपटू गोलंदाजी करत असतात तेव्हा तो कायम माझ्यावर विश्वास दाखवतो आणि मला स्लिपमध्ये उभं करतो. विराटच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतात आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा कायम प्रयत्न करत असतो”, असंही रहाणेने नमूद केलं.