जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील युद्ध खूप जुने आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या बॅट आणि बॉलच्या या लढाईत कधी विराट वर्चस्व गाजवताना दिसला तर कधी जेम्स अँडरसन. २०१४ मध्ये अँडरसनविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर २०१८ मध्ये, विराटने अँडरसनला त्याच्या विकेटसाठी वाट पाहायला लावली. मात्र, इंग्लडमध्ये अँडरसनने कोहलीवर वर्चस्व गाजवत त्याला दोनदा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनने सर्वाधिक वेळा विराटला बाद केले आहे. दरम्यान, कोहलीला बाद केल्यानंतर व्यक्त करत असलेल्या आनंदाबद्दल अँडरसनने आता भाष्य केलं आहे.

‘द टेलिग्राम’ साठीच्या एका लेखात जेम्स अँडरसनने आपलं मत मांडलं आहे. “जेव्हा मी लीड्समध्ये पहिल्या डावात कोहलीला बाद केले तेव्हा मनात खूप भावना होत्या. हे अगदी ट्रेंट ब्रिजसारखे होते. मला वाटते की विराटकडे आणखी बरेच काही आहे कारण तो एक चांगला खेळाडू आणि कर्णधार देखील आहे. जेव्हा त्याचा संघ विकेट घेतो तेव्हा त्याच्यासाठी ते किती महत्त्वाचे असते हे तुम्ही बघा, म्हणून आमच्यासाठी त्याला बाद करण्याचा काय अर्थ होतो हे मला विराटला दाखवायचे होते. आमचे मुख्य ध्येय भागीदारीत गोलंदाजी करणे होते आणि हेडिंग्लेने दुसऱ्या डावात केलेली कामगिरी याचे चांगले उदाहरण आहे. पहिले १२ चेंडू मी विराट कोहलीला टाकले तर हेडिंग्लेने १० चेंडू टाकले. जो रूट मला सांगत होता की त्याला अधिक खेळायला लाव.”

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून द ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडचा पराभव केला होता, पण लीड्समध्ये भारताला एक डाव आणि ७६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात. गुरुवारी रविचंद्रन अश्विन मालिकेतील पहिला सामना खेळू शकतो, तर फलंदाजी काही बदल दिसू शकतात.