न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरीस अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर Bio Secure Bubble चे नियम पाक खेळाडूंनी मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण संघाला परत पाठवू अशी थेट वॉर्निंग दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने PCB चे सीईओ वासिम खान यांच्याशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली.

“माझं आताच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून ३-४ वेळा नियमांचा भंग झाला. त्यांनी आपल्याला शेवटची वॉर्निंग दिली आहे. मला कल्पना आहे की तुम्हा सर्वांसाठी हा काळ खडतर आहे. फक्त १४ दिवस धीर ठेवा आणि यानंतर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकता…खोलीच्या बाहेर जाऊ शकता. पण यानंतर एकदाही आपल्याकडून नियमांचा भंग झाला तर ते आपल्याला घरी पाठवतील. असं झाल्यास आपल्यासाठी हे अतिशय लज्जास्पद असेल.” सीईओ वासिम खान यांनी Voice Note द्वारे पाकिस्तानी खेळाडूंना ताकीद दिली आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. १८ डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून, २६ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.