न्यूझीलंडमध्ये सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका सुरु आहे. मात्र त्याचबरोबर भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघादरम्यानही सराव सामने सुरु आहेत. याच संघांदरम्यान एकदिवसीय सराव सामन्यानंतर आता कसोटी सामने सुरु झाले आहे. क्रिस्टनचर्च येथे गुरुवारपासून या सराव कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना सुरु झाला.

या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी गडगडल्याचे चित्र दिसले. संपूर्ण भारतीय संघ २१६ धावा करुन तंबूत परतला. भारतीय फलंदाजांपैकी केवळ शुभमान गील आणि कर्णधार हनुमा विहारी यांनीच चांगला खेळ केला. शुभमानने ८३ तर हनुमाने ५१ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ भागीदारी केली. मात्र दोघांचा मैदानात ताळमेळ जुळलेला असतानाच हनुमा अगदी विचित्र पद्धतीने झेलबाद झाला.

झालं असं की न्यूझीलंडचा ऑफ स्पीनर कोल मॅककॉनीने हनुमाला गोलंदाजी करत होता. कोलने टाकलेल्या चेंडूवर हनुमाने स्वीप शॉर्ट मारला. मात्र हा चेंडू सीली मीड ऑनला उभ्या असणाऱ्या खेळाडूच्या पायावर लागून हवेत उडला. त्याचवेळी विकेटकीपरने प्रसंगावधान दाखवत हा चेंडू अचूक टिपला आणि हनुमा चांगला फटका खेळूनही झेलबाद झाला. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

आपण अशा विचित्र पद्धतीने बाद झालेलो आहोत यावर हनुमाचा विश्वासच बसत नव्हता. न्यूझीलंडचे खेळाडू हनुमा बाद झाल्याचा आनंद व्यक्त करत असतानाही तो क्रिजवरच उभा असल्याचे दिसले.