नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारतीय जलदगती गोलंदाज आशिष नेहराने खेळाडू म्हणून आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. नेहराने एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने २०२० चा टी-२० वर्ल्डकप खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली. एकीकडे धोनीने टी-२० मधून संन्यास घेण्याबद्दल चर्चांना उधाण आले असताना नेहराने हे मत व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या न्युझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना धोनीच्या संथ खेळीमुळे पराभव पत्कारावा लागल्याने धोनीवर टिकेची झोड उठली होती. तेव्हापासूनच धोनीच्या निवृत्तीवरून क्रिकेटपटूंमध्ये दोन गट पडल्याचे दिसते आहे.

आपल्या इच्छेबद्दल नेहरा म्हणाला की, ‘प्रत्येक घरात आपल्याला एखाद्या वयस्कर व्यक्तीची गरज असते.’ मला वाटते की पुढील दोन ते तीन वर्षे किंवा जोपर्यंत त्याची शारिरीक क्षमता त्याला साथ देईल तोपर्यंत तो क्रिकेट खेळेल असा विश्वास नेहराने व्यक्त केला. तसेच मी जर भारतीय संघाचा कर्णधार किंवा कोच असतो तर मी त्याला जास्तीत जास्त वेळ तू खेळत राहा, असेच सांगितले असते.

धोनी हा एक मोठा खेळाडू असून, जर आपला खेळ उत्तम होत नाहीये, असे त्याला वाटले तर तो स्वत: निवृत्ती घेईल, असे सांगतानाच नेहराने धोनीच्या निर्णयक्षमतेबद्दल माहिती दिली. धोनी एक उत्तम लीडर असल्याने स्वत: कधी थांबायचे हे त्याचे त्याला योग्यप्रकारे ठाऊक आहे. निर्णय घेण्यात धोनी किती उत्तम आहे हे आपण ऑनफिल्ड पाहिलेच आहे. तो इथेही तेच करेल. धोनी खूपच साधा पण तितकाच तगडा खेळ करणारा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याने शक्य तितक्या वर्षे खेळायला हवे. मी जर जलदगती गोलंदाज असून, वयाच्या ३९ वर्षांपर्यंत खेळू शकतो तर धोनी २०२०चा विश्वचषक खेळूच शकतो, असे नेहराने ठामपणे सांगितले.

याआधी धोनीच्या बाजूने भारतीय संघातील जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि संघाचा कर्णधार विराट कोहलीने शाब्दिक बॅटिंग केली होती.