यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतला ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषकासाठी ऋषभला पसंती देणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर विंडीज दौऱ्यात ऋषभला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, मात्र फलंदाजीमध्ये ऋषभने पुरती निराशा केली. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यातही ऋषभ चुकीचा फटका खेळून लवकर माघारी परतला. ऋषभची ही कामगिरी पाहता, निवड समितीने पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलत असताना ही माहिती दिली.

“ऋषभवर अतिक्रिकेटमुळे ताण येतोय का हे आम्ही पाहतोय. साहजिकच आम्ही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये (वन-डे, टी-२० आणि कसोटी) ऋषभसाठी पर्याय तयार करतो आहोत. के.एस.भारत, इशान किशन, संजू सॅमसन हे खेळाडू स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या कामगिरीवर आमचं लक्ष आहे.”

ऋषभच्या खेळावर आमचा विश्वास आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर आम्ही त्याच्या प्रगतीकडे लक्ष देत आहोत. त्याला संधी देत असताना थोडा संयम बाळगावा लागणार आहे. तो गुणवान खेळाडू आहे. ऋषभच्या कामगिरीबद्दल प्रसाद बोलत होते. गेल्या काही दिवसांत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही ऋषभच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ऋषभ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader