करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला होता. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रीडा स्पर्धा बंद असल्यामुळे आयोजकांचं मोठं नुकसान होत होतं. अखेरीस जर्मनीतील Bundesliga या स्पर्धेच्या रुपाने शनिवारपासून पहिली मोठी स्पर्धा सुरु होत आहे. क्रिकेट जगतातही बीसीसीआय पुन्हा एकदा स्पर्धा सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून आपली पावलं उचलत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय संघासाठीचा प्राधान्यक्रम निश्चीत केला आहे. टी-२० विश्वचषक खेळण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी IPL, दोन देशांमधील मालिका खेळण्यावर अधिक भर द्यावा असं मत शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. ते टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत होते.

अवश्य वाचा – IPL रद्द झाल्यास खेळाडूंच्या मानधनात होऊ शकते कपात !

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. आयसीसीशी संलग्न बहुतांश देश प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्यास तयारीत नाही. अशा परिस्थितीत रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंसाठी स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि दोन देशांमधील मालिका असा प्राधान्यक्रम तयार केलाय. “माझं मत आहे की दोन देशांमधील मालिकेने क्रिकेटची पुन्हा एकदा सुरुवात व्हावी. जर आम्हाला विश्वचषक आणि दोन देशांमधील मालिका असा पर्याय मिळाला तर आम्ही नक्कीच दोन देशांमध्ये मालिक खेळण्याचा पर्याय निवडू. सध्याच्या परिस्थितीत १५ संघ प्रवास करुन एका देशात येण्यापेक्षा दोन देशांनी एक किंवा दोन मैदानांमध्ये क्रिकेट मालिका खेळणं कधीही चांगलं.”

हीच गोष्ट आयपीएललाही लागू पडते. ज्यावेळी क्रिकेट पुन्हा एकदा सुरु करण्याची वेळ येईल त्यावेळी आपण पहिलं प्राधान्य आयपीएलला द्यायला हवं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आयपीएलमध्ये बराच फरक आहे. आयपीएल आपण नियजोन करुन एक किंवा दोन शहरांमधील मैदानात खेळवू शकतो. आयसीसीने क्रिकेट स्पर्धा सुरु करताना या गोष्टीचा विचार करायला हवा असं शास्त्री यांनी स्पष्ट केलं. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या मानधनात कपात केली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत.