भारतीय क्रिकेट संघाला सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांसारखे दिग्गज कर्णधार लाभले. या सर्वांनी क्रिकेटविश्वात टीम इंडियाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आता विराटनंतर भारताचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने विराटचा उत्तराधिकारी म्हणून एका धाकड फउलंदाजाचे नाव सुचवले आहे. युवराजच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात ऋषभ पंत टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो.

ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून पाहिल्यानंतर युवराज सिंग प्रभावित झाला आहे. पंत हुशार असून तो पुढे भारताचा कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारू शकेल, असे त्याला वाटते. २०१७मध्ये महेंद्रसिंह धोनीकडून पदभार स्वीकारल्यापासून विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. युवराजने पंतचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून वर्णन केले आहे.

हेही वाचा – श्रीलंकेला गेलेल्या टीम इंडियाची चिंता वाढली, प्रशिक्षकालाच झाला करोना!

यंदाच्या आयपीएल हंगामात पंतने दिल्लीचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने आठ पैकी सहा सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत युवराज म्हणाला, “मी ऋषभला संभाव्य भारतीय कर्णधार म्हणूनही पाहत आहे. कारण तो उड्या मारणारा, लखलखीत आणि सतत बोलणारा आहे. पण मला वाटते, की त्याच्याकडे नक्कीच चतुर मन आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने अतुलनीय काम केले. म्हणूनच, लोकांनी येत्या काही वर्षांत त्याला भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले पाहिजे.”

२०१७मध्ये भारताकडून पदार्पण केल्यापासून, २३ वर्षीय पंतने सुरुवातीला टीकेचा भडीमार सहन केल्यानंतर भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले.