माझा मुलगा अर्जुनला त्याच्या घडणाऱ्या वयात सर्वसामान्य क्रिकेटपटूप्रमाणे खेळू द्यावे, अशी विनंती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रसारमाध्यमांना केली. रविवारी ‘स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई’तर्फे आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावल्याबद्दल सचिनचा भारताचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार केला. या वेळी त्याला सन्मानपत्र आणि १०० शतकांचा लेखाजोखा प्रदान करण्यात आला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सचिन म्हणाला की, ‘‘या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्षणकर्ता वडील म्हणून माझे कर्तव्य बजावणार आहे. माझा मुलगा रविवारी पहिला अधिकृत क्लब सामना खेळला. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माझ्यावर वडिलांच्या पावलांवर पावले ठेवण्याचे दडपण नव्हते. माझ्या मुलानेही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे मी सर्वाना आर्जवी विनंती करतो की १४ वर्षांच्या अन्य मुलांप्रमाणेच त्याला सामान्यपणे खेळू द्यावे. कदाचित तो धावांच्या प्रेमात पडेल. जर कोणी अर्जुनला त्याची स्वत:ची ओळख दिली आणि त्याच्या खेळावर प्रेम केले तर मला त्याचे कौतुक वाटेल.
‘‘क्रीडापटू आणि क्रीडा पत्रकार यांचे ऋणानुबंधाचे नाते आहे. इथे मते, टीका, काही कल्पनाविलास सर्वकाही आहे. त्यामुळे एकंदर कोणत्याही गोष्टीविषयी माझी तक्रार नाही,’’ असे सचिनने सांगितले.
उदयोन्मुख क्रीडापटूंना मार्गदर्शन करताना सचिन म्हणाला की, ‘‘आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. समोर आव्हाने येतील, मग आरामात पेला. मार्ग कमी करणाऱ्या छोटय़ा वाटा शोधू नका.’’
या वेळी मुंबई क्रिकेट संघ (सर्वोत्तम संघ), अभिषेक नायर (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू), पूनम राऊत (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू), राही सरनोबत (सर्वोत्तम महिला क्रीडापटू), आदित्य मेहता (सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू), दीपिका जोसेफ (सर्वोत्तम क्रीडापटू-भारतीय खेळ), अरमान जाफर (सर्वोत्तम कनिष्ठ क्रिकेटपटू), महेश माणगावकर (सर्वोत्तम कनिष्ठ क्रीडापटू-मुले), तन्वी लाड (सर्वोत्तम कनिष्ठ क्रीडापटू-मुली) या क्रीडापटूंना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याचप्रमाणे हॉकी खेळाला अमूल्य योगदान देणाऱ्या मर्जबान ऊर्फ बावा पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाचा वेध घेणाऱ्या ‘जागर महाराष्ट्राचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय चेन्नईत वर्षांअखेरीस होणाऱ्या बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद लढतीच्या पाश्र्वभूमीवर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले आणि ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी आपल्या भाषणात विश्वनाथन आनंद जगज्जेतेपद जिंकेल, असा आशावाद प्रकट केला. तसेच एटीपी सारथी, जी. के. मेनन, राजू भारतन्, शिवशंकर सिंग, व्ही. व्ही. करमरकर, गिरीश दीक्षित, भजी भरुचा, प्रभाकर शिरोडकर या माजी क्रीडा पत्रकार आणि छायाचित्रकारांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा