आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अखेरीस अधिकृत घोषणा झालेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. यंदाच्या संपूर्ण स्पर्धेवर करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं सावट असलं तरीही आयपीएल सामन्यांचं प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports वाहिनीने या हंगामासाठी जय्यत तयारी करण्याचं ठरवलं आहे. तब्ब्ल ६ महिन्यांनी भारतीय खेळाडू प्रेक्षकांना मैदानात खेळताना दिसतील. त्यामुळे तेराव्या हंगामाची प्रेक्षकसंख्या वाढण्याचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. यासाठीच संधीचा फायदा करुन घेत Star Sports ने आपला जाहीरातीचे दर कमी न करण्याचं ठरवलंय.

Rediff ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल सामन्यांदरम्यान १० सेकंदाच्या जाहीरातीसाठी ८ ते १० लाख दर आकारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी Star Sports ने जाहीरातींच्या माध्यमातून ३ हजार कोटींची कमाई केली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातही तितकीच कमाई होईल अशी Star Sports ला अपेक्षा आहे. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान आणि इतर सामन्यांवेळी Star Sports ने जाहीरातदारांकडून १० सेकंदासाठी १६ ते २५ लाखांचा दर ठेवला होता. त्यातुलनेत आयपीएलसाठी Star Sports चे जाहीरात दर हे फार कमी मानले जात आहेत.

दरम्यान, आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामााठी ५ कंपन्यांनी आपली निवीदा दाखल केली आहे. ज्यात Tata Sons, Unacademy, Jio आणि Patanjali हे ४ ब्रँड भारतीय आहेत. चिनी गंतुवणूक असलेली Byju’s या कंपनीनेही स्पॉन्सरशिपसाठी निवीदा दाखल केली आहे. Tata उद्योगसमुहाने आतापर्यंत कुस्ती, फुटबॉल यासारख्या खेळात गुंतवणूक केली असली तरीही क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याचा टाटा उद्योगसमुहाचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. भारत आणि जगभरात टाटा उद्योगसमुहाचं नाव लक्षात घेता या कराराबद्दल फार गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे १८ तारखेला स्पॉन्सरशिपचे हक्क कोणत्या कंपनीला मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.