आपल्या लाडक्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ईडन गार्डन्सवरची अखेरची खेळी पाहण्यासाठी कोलकातावासीयांनी एकच गर्दी केली असली, तरी तो लवकर बाद झाल्याने प्रेक्षकांना निराश होऊन माघारी परतावे लागले. त्याची ही खेळी डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी कोलकातावासीयांनी गुरुवारी सकाळी ईडन गार्डन्स गाठले खरे, पण जागेवर बसतो न बसतो तोच सचिन १० धावांवर पायचीत झाल्याने स्टेडियम नि:शब्द झाले.
शेन शिलिंगफोर्डला मोठा फटका मारण्याच्या नादात सलामीवीर मुरली विजय बाद झाला, ही भारतासाठी वाईट गोष्ट असली तरी स्टेडियममध्ये अचानक उत्साह संचारला, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. कारण त्यांचा आवडता सचिन मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला होता. तो मैदानात दाखल होतानाच सर्व प्रेक्षकांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली आणि सचिनच्या नावाचा नाद पुन्हा एकदा घुमायला सुरुवात झाली.
सकाळी ९.३९ वाजता सचिन मैदानात दाखल झाला. शिलिंगफोर्डचा पहिला चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. त्यानंतरच्या टिनो बेस्टच्या षटकात ‘रिव्हर्स स्विंग’चा सामना करत ‘पॉइंट’ला सचिनने एकेरी धाव घेत आपले खाते उघडले. त्यानंतर शिलिंगफोर्डच्या षटकात स्वत:चा आणि संघाचा पहिला चौकार त्याने लगावला. त्यानंतर अजून एक चौकार लगावल्यावर प्रेक्षकांचा एकच जल्लोष सुरू झाला. पण त्यानंतर इंग्लंडचे पंच निगेल लाँग यांनी शिलिंगफोर्डच्या ‘दूसऱ्या’वर सचिनला पायचीत बाद दिले आणि स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली. त्यानंतर टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या चार इंच वरून जात असल्याचे निष्पन्न झाले, पण तोपर्यंत सचिनमय सोहळा आटोपला होता.
ईडन गार्डन्सची तिकिटे ठरली अमूल्य ठेवा
क्रिकेट सामन्यात निराशा झाली किंवा सामना संपल्यावर प्रेक्षक तिकिटे फाडतात किंवा फेकून देतात. पण ईडन गार्डन्सवरील सामन्याची तिकिटे मात्र प्रेक्षकांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे. कारण या तिकिटांवर सचिनचे छायाचित्र आणि सही छापण्यात आली असून प्रेक्षक नक्कीच ही तिकिटे जपून ठेवतील.

Story img Loader