5961 athletes tested for dope between 2021 and 2022 by India’s doping agency NADA: जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने अलीकडेच आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, भारताची डोपिंग एजन्सी नाडा खेळाडूंच्या योग्य संख्येची चाचणी करत नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात असा दावाही करण्यात आला आहे की, नाडाकडून क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीचे प्रमाण खूपच कमी आहे. एक प्रकारे, नाडा ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह इतर खेळाडूंच्या सतत चाचण्या घेत असताना क्रिकेटपटूंना मात्र झुकते माप दिल्याचे दिसते.
२०१९ पासून क्रिकेटपटूंची सुरू झाली डोपिंग चाचणी –
इंडियन एक्स्प्रेसच्या आरटीआयच्या उत्तरात दिलेल्या अहवालानुसार, २०२१ ते २०२२ दरम्यान, नाडाने ५९६१ चाचण्या घेतल्या आहेत, त्यापैकी फक्त १४४ क्रिकेटपटू आहेत. २०१९ पासून नाडाने क्रिकेटर्सची डोपिंग टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी नाडाकडून क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी घेतली जात नव्हती.
रवी दहियाची १८ वेळा डोपिंग टेस्ट झाली आहे –
एक्सप्रेसच्या अहवालानुसार, २०२१ ते २०२२ दरम्यान, खेळाडूंनी सर्वाधिक डोप चाचणी केली. ५९६१ डोप चाचण्यांपैकी १७१७ खेळाडूंच्या होत्या. ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर नाडाची विशेष नजर होती. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहियाची १८ वेळा डोप चाचणी झाली आहे. नाडाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दहियाचे नमुने घेतले. त्याचबरोबर वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला परदेशात राहूनही ८ वेळा आणि नीरज चोप्राला पाच वेळा डोपिंग टेस्ट द्यावी लागली आहे.
रोहित शर्माची सहा वेळा डोपिंग टेस्ट झाली आहे –
या तुलनेत क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर इथे प्रकरण काहीसे वेगळे दिसते. भारतीय कर्णधार रोहित शर्माची सर्वाधिक सहा वेळा चाचणी झाली आहे. रोहितची मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि यूएईमध्ये चाचणी घेण्यात आली. रोहितशिवाय सूर्यकुमार यादव आणि चेतेश्वर पुजाराची ३-३ वेळा चाचणी घेण्यात आली. माजी कर्णधार विराट कोहली, फलंदाज श्रेयस अय्यर, दीपक हुडा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यासह २५ बीसीसीआय केंद्रीय करारातील खेळाडूंपैकी १२ जणांची एकदाही चाचणी घेण्यात आलेली नाही.
महिला क्रिकेटपटूंचीही झाली आहे डोपिंग टेस्ट –
महिला संघाबद्दल बोलायचे झाले तर, येथे केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंची एकदा चाचणी घेण्यात आली आहे. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांची सर्वाधिक तीन वेळा चाचणी घेण्यात आली. इतर अॅथलेट्सच्या तुलनेत ही संख्या अगदीच माफक आहे. क्रिकेटपटूंनी नेहमीच असा युक्तिवाद केला आहे की, त्यांना त्यांचे स्थान नाडा सोबत शेअर करणे सोयीचे नाही. त्यामुळेच बीसीसीआयला नाडाच्या आत येण्यास बराच वेळ लागला.