IOIG opening ceremony in Madagascar: आफ्रिकन देश मादागास्करमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. वास्तविक, मादागास्करमध्ये आयोजित इंडियन ओशन आयलँड गेम्स (आयओआयजी) च्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, या अपघातात ८० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्राध्यक्षांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जनतेने शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू –
परदेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० हजार प्रेक्षक आले होते. यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला. मादागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘चेंगराचेंगरीत सुमारे ८० लोक जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.’
राष्ट्राध्यक्षांनी या घटनेबद्दल व्यक्त केला शोक –
मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. अनेक जण जखमी झाले आहेत. शोक व्यक्त करताना राष्ट्रपतींनी शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीचे खरे कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राष्ट्रपतीच्या शांततेच्या आव्हानानंतर लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी करून हा सोहळा सुरूच होता. इंडियन ओशन आयलँड गेम्स मादागास्करमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत. या कार्यक्रमात मॉरिशस, सेशेल्स, कोमोरोस, मादागास्कर, मेयोट, रीयुनियन आणि मालदीवमधील खेळाडू सहभागी झाले होते.
स्टेडियममध्ये यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत.
हेही वाचा – Team India: शुबमन गिलने Yo-Yo Test मध्ये मारली बाजी, विराट कोहलीला मागे टाकत ठरला अव्वल
स्टेडियममध्ये यापूर्वीही अशीच घटना घडली होती –
सुमारे ४१,००० लोकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. याआधी २०१९ मध्ये एका कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन ओशन आयलँड गेम्समध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये या प्रदेशातील अनेक देश भाग घेतात.