पाचव्या हंगामात पुरुष विभागात १२ संघ सहभागी होण्याची शक्यता

पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पाचव्या हंगामात प्रो कबड्डी लीगच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्या वेळी पुरुष विभागात आठऐवजी १२ संघांचा सहभाग असेल आणि स्वाभाविकपणे त्याचा कालावधीसुद्धा अधिक असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

‘‘प्रो कबड्डीच्या प्रत्येक हंगामाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. स्पध्रेची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे लवकरच ही स्पर्धा आणखी मोठय़ा प्रमाणात होणार आहे,’’ असे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चनने सांगितले. याशिवाय पुढील हंगामात लिलावानंतर जे खेळाडू सोबत असतील, त्यांच्यासोबत यशस्वीपणे वाटचाल करू, असा विश्वास आव्हान संपुष्टात आल्यानंतर यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केला होता.

चालू वर्षी दोन हंगाम खेळवल्यानंतर स्पध्रेच्या संयोजकांनी वर्षांत एकच हंगाम खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु सध्या होत असलेल्या ४० दिवसांच्या हंगामाऐवजी तो कालावधीत वाढवण्याचा ते गांभीर्याने विचार करीत आहेत. त्यानुसार पुढील हंगामात आणखी चार संघ सहभागी होणार असून, यात चेन्नई, अहमदाबाद, केरळ आणि गुवाहाटी या संघांचा सहभाग होण्याची चिन्हे आहेत.

प्रत्येक आठवडय़ात गुरुवार ते रविवार असे चार दिवस सामने असतील, तर तीन दिवस विश्रांती अशा प्रकारे किमान तीन महिने हा हंगाम चालू शकेल, अशा एका सूत्रावर विचारविनिमय सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तथापि, दोन महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेदरम्यान आगामी प्रो कबड्डी लीगचे सूत्र निश्चित केले जाणार आहे, असे भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.

पुरुषांच्या लीगबाबत जोरदार चर्चा चालू असताना यंदाच्या हंगामात प्रायोगिक तत्त्वावर झालेल्या महिलांच्या लीगबाबत मात्र संयोजक कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र पुरुषांच्या मैदानावर बहरू न शकलेल्या महिलांच्या कबड्डीविषयी सध्या तरी कोणीही भाष्य करू शकलेले नाहीत.