वडील चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक. आई सिनेसमीक्षक आणि पत्रकार. घरातूनच चित्रपटांचं बाळकडू मिळाल्यामुळे मुलगा या क्षेत्रातच झेंडा रोवून परंपरा सुरू ठेवणार अशी अटकळ होती. पण त्या मुलाने आईवडिलांचं क्षेत्र न निवडता क्रिकेटच्या मैदानाला आपली कर्मभूमी मानलं. सध्या देशभरात विविध ठिकाणी रणजी करंडक स्पर्धेचे सामने सुरू आहेत. स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडलेल्या खेळाडूंमध्ये त्या मुलाचं नाव अग्रणी आहे. त्या मुलाचं नाव आहे- अग्री चोप्रा. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 12th fail चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि समीक्षक पत्रकार अनुपमा चोप्रा यांचा हा लेक मैदानं गाजवतो आहे.
रिस्टार्ट नावाचं गाणं आहे. चित्रपटात मनोज शर्मा आणि गौरी भैय्या युपीएससी परीक्षेत नापास झाल्यावर हे गाणं वाजतं. “माझं आता या गाण्याशी एक कनेक्शन आहे पण मी मिझोरामला जाण्याच्या एक वर्षाआधी हे गाणं लिहिलं होतं. मी २०२३ मध्ये मिझोरामला गेलो. पण या गाण्यातील ओळी आयुष्यात सगळीकडेच लागू होतात,” असं अग्नीने ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.
क्रिकेटपटू अग्नी चोप्रा हा चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा आणि पत्रकार अनुपमा चोप्रा यांचा मुलगा आहे. अग्नीने मेघालयविरुद्धच्या प्लेट ग्रूपमधील सामन्यांत पाच शतकं झळकावली आहेत. २५ वर्षीय अग्नीने चार सामन्यांत ९५.८७ च्या सरासरीने ७६७ धावा केल्या आहेत. वडील चित्रपट निर्माते आणि आई पत्रकार असले तरी अग्नीचं पहिलं प्रेम चित्रपट नसून क्रिकेट आहे.
हेही वाचा – मुंबई इंडियन्सचे ‘हे’ प्रताप तुम्ही वाचलेत का?
“मी सात-आठ वर्षांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मला चित्रपटांची आवड नव्हती. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे. मी फक्त अभिनेत्यांबद्दल बोलत नाही तर निर्मात्यांबद्दलही बोलत आहे. माझ्या वडिलांमुळे मी त्या क्षेत्रात सहज जाऊ शकलो असतो, पण मला कधीच त्या क्षेत्राची आवड नव्हती,” असं अग्नी म्हणाला.
अग्नीने करिअरसाठी क्रिकेट निवडून त्याच्या वडिलांना आश्चर्यचकित केलं. त्याच्या वडिलांनाही खेळाची आवड आहे आणि त्यांनी ‘फरारी की सवारी’ हा क्रिकेटवरील चित्रपट तयार केला आहे. अग्नीने क्रिकेट करिअर म्हणून निवडल्यावर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती, तेही त्याने सांगितलं. “हा कोणाचा मुलगा आहे, माझा तर नक्कीच नाही असं ते गंमतीत म्हणायचे,” असं अग्नीने सांगितलं.
विधू विनोद चोप्रा अग्नीला त्याच्या खेळाबद्दल सातत्याने विचारत असतात. “तू हा फटका असा कसा खेळलास? तू असा कसा बाद झालास? असे प्रश्न ते सतत विचारत असतात. क्रिकेटच्या बाबतीत प्रत्येकजण कोच असतो. खेळाडूंपेक्षा न खेळणाऱ्यांना अधिक माहिती असते,” असं अग्नी म्हणतो.
अधिक चतुराईने खेळण्याची गरज; भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची प्रतिक्रिया
प्लेट ग्रुपमधील बॉलिंग अटॅक एलिट ग्रुपसारखे नाही. ज्युनियर गटात सातत्याने धावा करणाऱ्यांपैकी अग्नी एक होता. त्याने मुंबई अंडर-१९ संघाचे नेतृत्व केले होते. तसेच २०१९-२० मध्ये सीके नायडू ट्रॉफीमध्ये दुहेरी शतकासह ७६० धावा त्याने केल्या होत्या. तो मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अग्नीने जम्मू आणि काश्मीरविरोधात ४५ चेंडूमध्ये ७६ धावा केल्या होत्या. जम्मू आणि काश्मीरच्या टीममध्ये आयपीएल खेळणारे उमरान मलिक, युदवीर सिंग, रसिख सलाम आणि आबिद मुश्ताक हे खेळाडू होते. “मला माझी २०१ धावांची खेळी आठवते. बंगालविरुद्ध दादोजी कोंडदेव स्टेडियमवर हा सामना झाला होता. फिरकीला पोषक अशी ती खेळपट्टी होती. त्या सामन्यात मी धावा केल्या नसत्या तर मला टीममधून वगळण्यात आलं असतं. पहिल्या तीन सामन्यात मी फक्त अर्धशतक करू शकलो होतो. त्यामुळे ती मॅच माझ्यासाठी ‘करो वा मरो’ अशी होती,” अशी आठवण अग्नीने सांगितली. मात्र इतक्या धावा करूनही त्याला रणजी ट्रॉफीसाठी टीममध्ये घेण्यात आलं नव्हतं.
“जुलैमध्ये मिझोरामच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रायल्स झाल्या. मी ट्रायल्ससाठी गेलो होतो आणि नशीबाने माझी निवड झाली. माझ्यासाठी माझं शहर मुंबई सोडणं कठीण होतं. पण लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळण्याची हीच सर्वोत्तम संधी होती,” असं अग्नी म्हणाला.
अग्नीला खेळताना दुखापतही झाली. दोन वर्षांपूर्वी एका दुखापतीमुळे त्याला जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. “अंडर – २५ स्पर्धेच्या एक आठवडा आधी मी एका क्लबच्या सामन्यात स्लिपमध्ये फिल्डिंग करत होतो आणि एक चेंडू माझ्यासमोर आला तो थोडा लांब होता, पण तरीही मी तो पकडण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू माझ्या उजव्या हाताच्या बोटाला लागला. बोटाचं नखं मधूनच तुटलं आणि दुखापतीमुळे मी अडीच महिने बाहेर होतो,” असं अग्नीने सांगितलं.
अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिल हे अग्नीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी त्याला कठीण काळात मदत केली. “अर्जुन आणि मी एकत्र मोठे झालो आहोत. आम्ही प्रत्येक वयोगटात एकत्र खेळलोय. आम्ही एकाच क्लबकडून खेळायचो. त्यांनाही दुखापती झाल्या आहेत. दुखापतीमुळे बोटाची जराही हालचाल करु शकत नव्हतो, तेव्हा मी माझी बॅट, चेंडू किंवा कॅच कसा पकडेन असा प्रश्न मला पडला होता. मला खूप नकारात्मक विचार येत होते. पण त्या दोघांनी मला समजावलं की ही जखम आहे, ज्याला तू काहीच करू शकत नाही आणि दुखापती या खेळाचा भाग आहेत,” असं अग्नी म्हणाला.
२०१९ मध्ये अग्नीने त्याच्या पालकांचं घर सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. तो शुबमनचा गिलचा ट्रेनर खुशप्रीत सिंग औलख यांच्याबरोबर राहू लागला. खुशप्रीतला वाटत होतं की अग्नी त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यास तो आणखी चांगलं करू शकेल. “मी केकेआर अकादमीमध्ये काम करत होतो, तेव्हा अभिषेक नायरमुळे (मुंबईचा माजी क्रिकेटपटू) माझी विधू विनोद चोप्रांशी भेट झाली. मी शुबमनला प्रशिक्षण देत होतो, अग्नीला प्रशिक्षण देऊ शकतोस का? असं विधू विनोद चोप्रांनी मला विचारलं. त्यावेळी माझी एकच अट होती की अग्नीने त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं,” असं खुशप्रीत सिंग औलख म्हणाले.
“मी घरातून बाहेर पडलो कारण माझ्यासाठी सगळं सोपं होतं आणि आरामदायक होतं. मात्र घर सोडल्यानंतर एक व्यक्ती म्हणून माझ्यात खूप बदल झालेत,” असं अग्नी सांगतो. मिझोरमसाठी सातत्याने धावा करत असला तरी अग्नी यामुळे हुरळून गेलेला नाही. तो म्हणाला, “होय, मी पाच शतकं झळकावली आहेत. जर आम्ही एलिट गटासाठी पात्र ठरलो नाही तर या शतकांचा उपयोग नाही. एलिट गट हेच आमचं उद्दिष्ट आहे.”