Ira Jadhav Records Highest Individual Score in Women’s U-19 One Day Trophy : मुंबईची १४ वर्षीय सलामीची फलंदाज इरा जाधवने मेघालयविरुद्ध त्रिशतक झळकावत मोठा पराक्रम केला आहे. ती अंडर-१९ क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय ठरली आहे. यासह ती अंडर-१९ महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली. या बाबतीत इराने भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला मागे टाकले आहे.

महिला अंडर-१९ वनडे ट्रॉफीमध्ये मेघालय यांच्यातील सामन्यात मुंबईची फलंदाज इरा जाधवने ऐतिहासिक खेळी केली. बंगळुरूच्या अलूर क्रिकेट स्टेडियमवर इराने खूप चौकार आणि षटकारांची बरसात केली. तिने २२० च्या जीवघेण्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. इराने अवघ्या १५७ चेंडूंचा सामना करताना इराने ४२ चौकार आणि १६ षटकारांसह ३४६ धावांची विक्रमी खेळी केली. इतकेच काय, मेघालयच्या एकाही गोलंदाजाला तिला बाद करण्यात यश आले नाही.

इरा जाधवच्या या त्रिशतकाच्या जोरावर मुंबईने निर्धारित ५० षटकांत केवळ तीन गडी गमावून ५६३ धावांचा डोंगर उभारला. इरा जाधवशिवाय संघाची कर्णधार हार्ले गालानेही शतक झळकावले. गालाने ११६ धावांची खेळी खेळली. तिने ७९ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय दीक्षा पवारने ३९ आणि मिताली हर्षद म्हात्रेने १८ चेंडूत नाबाद २६ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

मुंबई पहिला संघ ठरला –

या स्पर्धेत ५०० धावा करणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे. हा पराक्रम यापूर्वी कोणत्याही संघाला करता आला नव्हता. इरा जाधव भारताच्या अंडर-१९ महिला विश्वचषक संघातील राखीव खेळाडूंपैकी एक आहे. तिने अशीच फलंदाजी सुरू ठेवल्यास लवकरच भारतीय राष्ट्रीय संघात स्थान निश्चित करू शकतो.

Story img Loader