Team India World Cup Squad 2023 Announcement: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडकर्त्यांनी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर –

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेतील कँडी येथील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. अनफिट केएल राहुलची निवड संघात करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी निवड झालेल्या तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात ठेवण्यात आलेले नाही.

संघ निवडीवर काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित म्हणाला, “वनडे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जास्त वेळ असतो. टी-२० मध्ये तुमच्याकडे रणनीती बनवायला किंवा नवीन योजनांचा विचार करायला वेळ नसतो. हे फक्त आमच्याबाबतीत नाही, तर प्रत्येक टीमबाबत आहे. प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये असे घडते. काही खेळाडू संघात स्थान मिळवू शकत नाहीत. आम्हाला सर्वोत्तम संघ निवडायचा आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला कोणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागेल. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघात खोली हवी आहे. गेल्या काही वर्षात आमच्या संघात याची कमतरता आहे. अनेक प्रसंगी आम्हाला असे वाटले की आमच्या संघात फलंदाजीची खोली नाही. नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या क्रमांकावरील खेळाडूंचे काम फक्त गोलंदाजी करणे नाही. अनेक प्रसंगी हे लोक १०-१५ धावा करतात, जे विजय आणि पराभव यातील फरक सिद्ध करते.”

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

२७ सप्टेंबरपर्यंत संघात केले जाऊ शकतात बदल –

आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांचा संघ घोषित करायचा आहे. २७ सप्टेंबरपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप २०२३ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत संघ निश्चित करण्यात आला. आता संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.