क्रिकेट विश्वात आपली नाममुद्रा कोरणारा सचिन तेंडुलकर घडला तो मुंबईच्या क्रिकेटवेडय़ा मैदानी मातीत. शालेय क्रिकेटपासूनच तो चमकू लागला आणि बडय़ा क्रिकेटपटूंच्या नजरेतही भरू लागला होता. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा वारसा पुढे चालविण्याच्या आणाभाका अनेकांनी घेतल्या पण मुंबईतल्याच पृथ्वी शॉ या अवघ्या १५ वर्षांच्या क्रिकेटवीराने आझाद मैदानावर ८५ चौकार आणि ५ षटकारांसह तब्बल ५४६ धावांचा आजवरचा सर्वोच्च विक्रम रचत सचिनला एकप्रकारे अनोखी निवृत्तीभेटच दिली.
पृथ्वीने ‘हॅरिस शिल्ड आंतर शालेय क्रिकेट स्पर्धे’त बोरिवलीच्या फ्रान्सिस डि असिसी विरुद्ध रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाचे प्रतिनिधित्व करताना ही अद्भुत खेळी साकारली. देशातील अधिकृत स्वरूपाच्या आंतरशालेय क्रिकेटमधली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.
रिझवीच्याच अरमान जाफरने हॅरिस शिल्ड स्पर्धेत ४९८ धावांची खेळी केली होती. पृथ्वीने अरमानचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही स्वरुपातील उपलब्ध सांख्यिकीनुसार पृथ्वीची खेळी ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. १८९९ मध्ये एइजे कॉलिन्स यांनी ६२८ धावा केल्या होत्या तर १९०१ मध्ये सी जे इडीने ५६६ यांनी धावांची खेळी केली होती. फ्रान्सिस संघाला ९२ धावांत गुंडाळल्यानंतर पृथ्वीच्या अविश्वसनीय खेळीच्या जोरावर रिझवीने १ बाद ९९१ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे ८९९ धावांची प्रचंड आघाडी आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या शालेय स्तरावरील क्रिकेटमध्ये पृथ्वीचे नाव चमकत आहे. एका क्रिकेट शिष्यवृत्तीच्या निमित्ताने पृथ्वीने इंग्लंडमधील ग्लुस्टरशायर येथील अकादमीत प्रशिक्षण घेतले तसेच त्यांच्या द्वितीय संघातर्फे काही सामनेही खेळले.रिझवी शाळा पृथ्वीला १ लाख रुपयांच्या बक्षीसाने गौरवणार आहे. तर त्याच्या शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शाळा उचलणार आहे.
५०० धावा करायच्या असे काही डोक्यात नव्हते. खेळत राहायचे हे ठरवले होते. माझा साथीदार सत्यलाश दीपक जैनची साथ लाभली त्यामुळे मोठी खेळी साकारू शकलो. हे शतक वडिलांना आणि सचिन तेंडुलकरला समर्पित करतो. या खेळीने आनंद झाला आहे. माझ्या खेळीने संघाला मोठी धावसंख्या उभारता आली याचे समाधान आहे. प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करून खेळ, असा सल्ला प्रशिक्षकांनी दिला होता.
– पृथ्वी शॉ</strong>
१५व्या वर्षी अशी खेळी साकारणे निश्चितच कौतुकास्पद आहे. ही खेळी अविस्मरणीय अशीच आहे. त्याने सर्व गोलंदाजांवर आक्रमण करत वर्चस्व गाजवले.
– राजू पाठक, रिझवीचे प्रशिक्षक