मेलबर्न : गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत आपल्या व्यावसायिक कारकीर्दीतील पहिला ग्रँडस्लॅम सामना जिंकल्यानंतर रशियाची १६ वर्षीय टेनिसपटू मीरा आन्द्रिवाने आपली आदर्श असलेल्या ओन्स जाबेऊरसोबत सराव करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती संधी आन्द्रिवाला मिळाली नाही. मात्र, बुधवारी ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आन्द्रिवाला जाबेऊरविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात आपल्यातील आलौकिक प्रतिभा सिद्ध करताना आन्द्रिवाने धक्कादायक निकालाची नोंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉड लेव्हर अरिनावर दुपारच्या सत्रात झालेल्या या सामन्यात आन्द्रिवाने ग्रँडस्लॅम स्पर्धातील तीन वेळच्या उपविजेत्या टय़ुनिशियाच्या जाबेऊरचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या फेरीच्या या सामन्यात आन्द्रिवाने जाबेऊरची सव्‍‌र्हिस तब्बल पाच वेळा तोडली. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत कालावधीत आन्द्रिवाने झपाटयाने प्रगती केली आहे. आता तिने सहाव्या मानांकित जाबेऊरला पराभूत करताना युवा कारकीर्दीतील सर्वात मोठया विजयाची नोंद केली. जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या प्रतिस्पर्धीला नमवण्याची ही आन्द्रिवाची पहिलीच वेळ ठरली आहे. पुढील फेरीत तिच्यासमोर फ्रान्सच्या डियाना पॅरीचे आव्हान असेल. 

हेही वाचा >>> “लग्न काय, घटस्फोट काय दोन्हीही कठीणच…”, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

गतविजेती अरिना सबालेन्का आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या कोको गॉफलाही आगेकूच करण्यात यश आले. दुसऱ्या मानांकित सबालेन्काने ब्रेंडा फ्रुविटरेवाचा ६-३, ६-२ असा पराभव केला. चौथ्या मानांकित अमेरिकेच्या गॉफने कॅरोलिन दोलेहिडेला ७-५ (७-२), ६-२ असे नमवले.

जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय

गतविजेत्या नोव्हाक जोकोविचला पहिल्या फेरीपाठोपाठ दुसऱ्या फेरीतही विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जोकोविचने चार सेट रंगलेल्या लढतीत बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पॉपिरिनला ६-३, ४-६, ७-६ (७-४), ६-३ असे पराभूत केले. पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह आणि सातवा मानांकित स्टेफानिस त्सित्सिपास यांनाही तिसरी फेरी गाठण्यात यश आले. रुब्लेव्हने ख्रिस्टोफर युबँक्सचा ६-४, ६-४, ६-४ असा, तर त्सित्सिपासने जॉर्डन थॉम्पसनचा ४-६, ७-६ (८-६), ६-२, ७-६ (७-४) असा पराभव केला.

ओन्सविरुद्ध (जाबेऊर) खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. तिच्याविरुद्ध खेळणे हे माझे स्वप्न होते. तिचा खेळ पाहून मला चांगले टेनिस खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे माझ्यासाठी हा विजय खूप खास आहे. माझ्या कारकीर्दीतील हा सर्वात मोठा विजय होता. – मीरा आन्द्रिवा

सुमित नागल

(दुसऱ्या फेरीचा सामना आज)

’ वेळ : अंदाजे सकाळी ८ वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, ५

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 year old andreeva shocks jabeur in second round of australian open zws