काही व्यक्तींचे मन स्थिर राहत नाही. सतत नवीन काही तरी करण्याची किंवा शिकण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही; पण स्वत:चा शोध घेण्याच्या त्यांच्या याच वृत्तीतून अनेक पैलू उलगडत जातात. हरयाणातील सोळा वर्षीय मनू भाकेर अशीच वृत्ती जोपासणारी, नव्याच्या शोधात धडपडणारी. तिला खेळाची भारी हौस म्हणून खेळांच्या बाबतीतच तिने अनेक प्रयोग केले. बॉक्सिंग, क्रिकेट, कबड्डी, टेनिस, मार्शल आर्ट, कराटे इत्यादी बऱ्याच खेळांचे नैपुण्य तिने आत्मसात केले; पण तिचे मन तिला सतत नवीन काही करण्यासाठी साद घाले. या सर्व प्रयोगांत तिने प्रत्येक खेळात पदकांची कमाईसुद्धा केली, तरीही तिला एक वेगळी वाट खुणावत होती. बरोबर दोन वर्षांपूर्वी तिला ती गवसली. एप्रिल २०१६ मध्ये शाळेतील एका स्पर्धेत हौसेखातर तिने नेमबाजीत नेम अजमावला आणि २०१८ मध्ये ती विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात युवा भारतीय नेमबाज ठरली. हरयाणाच्या मनूचा हा प्रवास थोडा संभ्रमात टाकणारा आहे, पण विश्वचषक स्पर्धेतील यशाने तिने भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेतच, शिवाय स्वत:मधला खेळाडूही तिला शोधण्यात यश मिळाले आहे. मेक्सिको येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनूने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरयाणाच्या झाझर जिल्ह्य़ातील गोरिया गावात वाढलेली मनू लहानपणापासूनच खेळात रमलेली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या सहा महिन्यांत तिने पहिले राज्यस्तरीय कांस्यपदक जिंकले, पण बॉक्सिंगमध्ये ती फार काळ रमली नाही. त्यानंतर क्रिकेट, कबड्डी, टेनिस, टंग टा (मणिपुरी मार्शल आर्ट) आणि कराटे अशा सगळ्या खेळांत तिने प्रभुत्व मिळवले. वडील रामकिसन पेशाने समुद्री (मरीन) अभियंता असल्याने मनूच्या घरची आर्थिक स्थिती समाधानकारक होती. घरच्यांनीही मनूला खेळ निवडण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. तिला हवे ते करण्याची मुभा होती आणि ती आपला मार्ग शोधण्यासाठी धडपडत होती. त्यामुळे प्रत्येक खेळात तिने स्वत:ला झोकून दिले. या खेळांव्यतिरिक्त मनू राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेची विजेती आहे. अ‍ॅथलेटिक्स, कराटे आणि टांग टा यांच्या राष्ट्रीय स्पर्धाही तिने जिंकल्या आहेत.

राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या मनूला तरीही हवा तो मार्ग सापडत नव्हता. दोन वर्षांपूर्वी तो दिवस उजाडला आणि मनूला ‘मनू’ गवसली. झाझर जिल्ह्य़ात केवळ एकच नेमबाजीची रेंज आहे आणि ती गोरिया गावातील युनिव्हर्सिटी सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये. मनूच्या घरापासून हे अंतर २५ किलोमीटर दूर आहे. मात्र सर्व खेळांचा अनुभव घेतल्यानंतर मनूचा नेमबाजीत रस वाढू लागला. नेमबाजीच्या पहिल्याच सत्रात तिने प्रशिक्षकांची वाहवा मिळवली. तिचा खेळ पाहून ती बरीच वर्षे नेमबाजीचा सराव करत असल्याचे प्रशिक्षकांना वाटते. अवघ्या दोन वर्षांत तिने युवा (१८ वर्षांखालील), कनिष्ठ (२१ वर्षांखालील) आणि वरिष्ठ स्तरावरील १५ राष्ट्रीय पदके जिंकली. २०१७ च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात नऊ सुवर्णपदके जिंकली आणि या जेतेपदाच्या शर्यतीत तिने ऑलिम्पिकपटू हीना सिधूवर विजय मिळवला. त्यानंतर महिन्याभरात झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ स्तरावरील दोन राष्ट्रीय विक्रम तिने नावावर केले.

मनूच्या या सततच्या खेळातील प्रयोगाने तिच्या आईची चिंता वाढवली होती. या स्वभावाचा मनूच्या तंदुरुस्तीवर परिणाम होईल, अशी भीती त्यांना नेहमी वाटत होती. डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे मनूला बॉक्सिंग सोडावे लागले होते, पण मनूचा नेमबाज बनण्याचा निर्धार पक्का होता. सराव शिबिरात उत्तम कामगिरी केल्यानंतर तिने वडिलांकडे स्वत:च्या पिस्तुलाची मागणी केली. वडिलांनी तिला लहरी स्वभावाचे दाखले देत ती देण्यास सुरुवातीला नकार दिला, परंतु मनूने नेमबाज बनण्याचे आश्वासन दिले आणि वडिलांनी जवळपास दीड लाख रुपयांची पिस्तूल घेतली. विश्वचषकातील सुवर्णपदकानंतर ही गुंतवणूक फायद्याची झाली, अशी पहिली प्रतिक्रिया मनूच्या वडिलांनी दिली; पण तिच्या या प्रवासात अडथळे आले. पिस्तूल परवाना घेण्यासाठी मनू आणि तिच्या वडिलांना जवळपास दोन-अडीच महिने ४५ किलोमीटर दररोज हेलपाटे घालावे लागले. आशियाई युवा स्पर्धा तोंडावर असताना सराव सोडून मनूची परवान्यासाठीची धावपळ सुरू होती. अखेरीस प्रसारमाध्यम आणि हरयाणाच्या शिक्षणमंत्र्यांच्या प्रयत्नांनी तिला परवाना मिळाला. त्या वेळी मनूने आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आणि तो अस्तित्वातही उतरवला. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनूने मेक्सिकोच्या अ‍ॅलेझांड्रा जेव्हेलाला पराभूत केले. दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकणारी जेव्हेला १९९८ पासून नेमबाजी करत आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे मनू त्या वेळी अवघ्या चार वर्षांची होती. झाव्हियाशिवाय मनूने या स्पर्धेत रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती अ‍ॅना कोराकाकी, लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती सेलिन गोबेव्‍‌र्हीले आणि रिओतील कांस्यपदक विजेती हैदी गेर्बर यांनाही पराभवाची चव चाखवली. अशा प्रयोगशील मनूकडून आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत अपेक्षा उंचावल्या आहेत.

स्वदेश घाणेकर swadesh.ghanekar@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 year old shooter manu bhaker inspiring journey