क्रिकेट खेळताना चेंडूचा जोरदार फटका बसून १७ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बांगलादेशमध्ये घडली आहे. शुक्रवारी ढाका शहरात हा प्रकार घडल्याचं समोर येतंय. रफीक इस्लाम असं या खेळाडूचं नाव असून, आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना हा अपघात घडल्याचं समोर येतय. रफिकच्या संघाने आपल्याच परिसरातील ओळखीच्या मुलांशी एक क्रिकेटचा सामना आयोजित केला होता. या सामन्यात रफिक काहीकाळासाठी पंच म्हणून काम पाहत होता.

ढाका शहरातील बलुर मठ परिसरात रफिक आपल्या मित्रांसोबत एका क्रिकेट सामन्यात सहभागी झाला होता. या सामन्यात आपला संघ फलंदाजी करत असताना रफिक काहीकाळ पंचांची भूमिका बजावत होता. मात्र यादरम्यान  रफिकच्या छातीत चेंडू आदळल्याने त्याला अस्वस्थ वाटायला लागलं, यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ढाका मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल केलं, मात्र तोपर्यंत रफिकचा मृत्यू झाला होता.

रफिकचा परिवार हा अतिशय गरीब आहे. त्याचे वडील हे ढाका शहरात रिक्षा चालवायचं काम करतात तर आई घरकाम करते. या घटनेनंतर रफिकच्या आई-वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिलीप ह्यूजचा भर सामन्यात चेंडू लागून, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader