अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अवघ्या १८वर्षांची असलेली कोको आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वेयतेकशी विजेतेपदासाठी झुंज देणार आहे. कोकोने उपांत्य फेरीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा ६-३-६-१ असा पराभव केला. हा सामना एक तास २८ मिनिटे चालला. १८ वर्षांच्या कालावधीनंतर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोको सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २००४ मध्ये रशियाची मारिया शारापोव्हा अंतिम सामन्यात खेळणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोको गॉफ सध्या जागतिक क्रमवारीत 23व्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलेले नाही. अशा स्थितीत आता ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूशी झुंजणार आहे. १३ मार्च २००४ रोजी अटलांटा येथे जन्मलेल्या कोकोला खेळाची पार्श्वभूमी आहे. तिचे वडील बास्केटबॉल खेळाडू तर आई अॅथलीट आहे. कोकोलादेखील लहानपणापासून खेळाची आवड होती. भविष्यात तिने टेनिसची निवड केली. दिग्गज अमेरिकन टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स या तिच्या आदर्श आहेत. कोकोला या दोन्ही महिला टेनिसपटूंकडून प्रेरणा मिळाली आहे.

कोकोने २०१७ मध्ये कनिष्ठ गटात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे उपविजेता मिळवले होते. त्यानंतर २०१८ मध्ये, तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील एकेरी विजेतेपद जिंकून कनिष्ठ गटात अव्वल स्थान मिळवले होते. त्याच वर्षी तिने कनिष्ठ गटात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपदही जिंकले होते. मार्च २०१९ मध्ये, मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून तिने मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात तिने केटी मॅकनीलीचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात तिला दारिया कासात्किनाकडून पराभव पत्करावा लागला होता.

१८ वर्षीय कोको गॉफची आतापर्यंतची टेनिस कारकीर्द अतिशय चांगली राहिला आहे. ग्रँड स्लॅम एकेरीबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१९ मध्ये यूएस ओपनची तिसरी फेरी गाठली होती. २०१९ आणि २०२१मध्ये ती विम्बल्डनची चौथी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय २०२० मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीतही जागा मिळवली होती. यावर्षी तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जर तिने विजेतेपद जिंकले तर मारिया शारापोव्हानंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरेल.