Team India on World Cup 2023: १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, “भारताला सध्याच्या विश्वचषकात आपला दबदबा कायम राखून जर जेतेपद पटकावता आले नाही, तर कदाचित विजेतेपदासाठी पुढील तीन विश्वचषकांची वाट पाहावी लागेल.” क्लब प्रेरी फायर पॉडकास्टशी बोलताना शास्त्री म्हणाले की, “संघातील बहुतेक सदस्य त्यांच्या करिअरच्या उच्च शिखरावर आहेत. भारताकडे आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.” अॅडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन हे देखील पॉडकास्टचा भाग होते.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “ संपूर्ण भारत देशात क्रिकेट खेळाचे वेड शिगेला पोहोचले आहे. त्यात विविध सणांचा काळ असताना टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. १२ वर्षांपूर्वी भारताने एकदिवसीय विश्वचषक सामना जिंकला होता. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते कदाचित हे असू शकते. त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. जर त्यांनी ही संधी गमावली तर कदाचित त्यांना आणखी पुढील तीन विश्वचषक जिंकण्यासाठी वाट पाहावी लागेल. सध्या भारतीय संघात असे खेळाडू आहेत की जे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियातील ७-८ खेळाडू त्यांच्या करिअरच्या एकदम शिखरावर आहेत. कदाचित त्यांचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत त्यावरून असे वाटते की, यावेळी टीम इंडिया नक्की विश्वचषक जिंकेल.”
भारतीय गोलंदाजी आक्रमणाने आतापर्यंतच्या स्पर्धेत फलंदाजांची पळताभुई केली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान त्रिकूटाने धारदार गोलंदाजी करत विरोधी संघांना नेस्तनाबूत केले. त्यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सध्या ते खूप चर्चेत आहेत. दुसरीकडे, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने मधल्या षटकांमध्ये सतत विकेट्स घेत संघाला मदत केली आहे. “सध्याचे गोलंदाजी आक्रमण हे भारताचे आतापर्यंतचे मी पाहिलेले सर्वोत्तम गोलंदाज आहेत,” असे शास्त्री यांनी मत व्यक्त केले आहे.
शास्त्री पुढे म्हणाले, “रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा भारतीय संघ विलक्षण खेळत आहे. हे सर्व एका रात्रीत घडले नाही. संघ चार ते पाच वर्षांपासून प्रत्येकाविरुद्ध खेळत आहे. सिराज तीन वर्षांपूर्वी संघात सामील झाला. त्याला माहित आहे की कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची. श्रेयस अय्यर देखील चार वर्षापासून सातत्यपूर्ण मोठे फटके मारत आहे. त्यामुळे त्याला कशी फलंदाजी करायची हे माहिती आहे.”
सिराजबाबत शास्त्री म्हणाले की, “गोलंदाजी करताना आकर्षक दिसणे महत्त्वाचे नाही हे त्याला माहीत आहे. त्यात सातत्य आणि चेंडू योग्य ठिकाणी टाकणे महत्त्वाचे आहे. या विश्वचषकात त्याने क्वचितच शॉट बॉल गोलंदाजी केली असेल. जर एखादा आखूड टप्प्याचा चेंडू असेल तर आश्चर्यचकित करणारे शस्त्र म्हणून वापरले जाते. मात्र, त्याच्या गोलंदाजीतील ९० टक्के चेंडू हे स्टंपला लक्ष्य करतात. भारतात अशीच गोलंदाजी केली पाहिजे. शमीच्या सीम पोझिशनमुळे चेंडू खूप स्विंग होत आहे, त्यामुळे फलंदाजाना फलंदाजी करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. एकदिवसीय क्रिकेट सुरू झाल्यापासून ५० वर्षांतील हे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे.”