अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सने सहज विजय मिळवला. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेल्या या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी तमिम इक्बाल भोपळाही फोडू शकला नाही. अनामूल हकने ४४ धावांची खेळी करत डाव सावरला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी मुशफकीर रहीमसह ५२ धावांची भागीदारी केली. अनामूल हक बाद झाल्यानंतर मुशफकीरला शाकीब अल हसनची साथ मिळाली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. मुशफकीर ६३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावा करून तंबूत परतला. त्याला परवेझ रसूलने बाद केले. शकीबला रैनाने त्रिफळाचीत केले. त्याने ५२ धावांची खेळी केली. महमदुल्लाने ४१ धावा करत बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मात्र अन्य फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही. बांगलादेशने २७२ धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा या नव्या जोडीने ९९ धावांची खणखणीत सलामी दिली. सहा वर्षांनंतर संघात परतलेल्या उथप्पाने ४४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. शकीब उल हसनने त्याला पायचीत करत ही जोडी फोडली. १६.४ षटकांत १ बाद १०० अशी स्थिती असताना पावसाचे आगमन झाले. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला २६ षटकांमध्ये १५० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. ५४ चेंडूंत ५० धावा करण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांनी सहजपणे पेलले. रहाणेने ७० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ५० षटकांत ९ बाद २७२ (मुशफकीर रहीम ५९, शकीब उल हसन ५२ ; उमेश यादव ३/४८) पराभूत विरुद्ध भारत : (सुधारित लक्ष्य-२६ षटकांत १५० धावा) २४.५ षटकांत ३ बाद १५३ (अजिंक्य रहाणे ६४, रॉबिन उथप्पा ५०, शकीब उल हसन २/२७). सामनावीर : अजिंक्य रहाणे.
भारतीय संघाचा सहज विजय
अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सने सहज विजय मिळवला.
First published on: 16-06-2014 at 12:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1st odi ajinkya rahane robin uthappa hit fifties as india beat bangladesh by 7 wickets