डावखुरा जुनेद खान याचा पहिला प्रभावी स्पेल आणि नासिर जमशेद याने केलेल्या शतकामुळेच पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामना सहा विकेट्स व ११ चेंडू राखून जिंकला. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने केलेले नाबाद शतक होऊनही भारताला निर्धारित षटकांमध्ये २२७ धावांपर्यंत पोहोचता आले. पाकिस्तानने हे लक्ष्य ४८.१ षटकांत व चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. मात्र चौकारांची व षटकारांची बरसात पाहावयास आलेल्या प्रेक्षकांची येथे निराशाच झाली.
क्रिकेटमध्ये विजय मिळवायचा असेल तर सांघिक प्रयत्नांची आवश्यकता असते, याचाच प्रत्यय घडवीत पाकिस्तानने सर्व आघाडय़ांवर भारतापेक्षा सरस कामगिरी केली. जुनेद खानने पहिल्या स्पेलमध्ये भारताचे चार फलंदाज तंबूत धाडताना भारतीय फलंदाजीचा कणाच मोडला. त्यामुळेच की काय धोनीने नाबाद शतक करूनही भारताला निर्धारित ५० षटकांमध्ये ६ बाद २२७ धावांपर्यंतच मजल गाठता आली. त्यानंतर खराब सुरुवात होऊनही जमशेदच्या शतकामुळे पाकिस्तानने २२८ धावांचे लक्ष्य पार करत विजय मिळविला. भारताकडे हुकमी गोलंदाज नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातच भारताच्या क्षेत्ररक्षकांनी महत्त्वाच्या क्षणी केलेल्या अक्षम्य चुका पाकिस्तानच्या पथ्यावरच पडल्या. सलामीचा फलंदाज नासिर जमशेद याने झुंजार फलंदाजी करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
खेळपट्टी द्रुतगती गोलंदाजांना सुरुवातीला साथ देत असली तरी थोडासा संयम ठेवला व आत्मविश्वासाने फलंदाजी केली तर आपोआप धावा मिळू शकतात, याचा प्रत्यय कर्णधार धोनी, सुरेश रैना व रवीचंद्रन अश्विन यांनी घडविला. धोनी याने कर्णधारपदाला साजेसा खेळ केला, पण त्याचबरोबर योग्य वेळी आपल्या नावलौकिकास साजेशी आक्रमक खेळीही केली. त्याचे शतक व त्याने रैनाबरोबर केलेली ७३ धावांची भागीदारी व त्यापाठोपाठ त्याने अश्विनच्या साथीत केलेली अखंडित शतकी भागीदारी यामुळेच भारताला ६ बाद २२७ अशी समाधानकारक धावसंख्या रचता आली.
खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असल्यामुळेच पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याचा हा निर्णय लगेचच यशस्वी ठरला. जुनेद खान याने वीरेंद्र सेहवागचा त्रिफळा उडवीत भारताच्या डावास खिंडार पाडले. पाठोपाठ मोहम्मद इरफानने गौतम गंभीरचाही त्रिफळा उडविला. या धक्क्य़ातून भारत सावरत नाही, तोच जुनेदने स्वत:च्या तिसऱ्या षटकांत विराट कोहली व युवराज सिंग यांचा त्रिफळा उडवीत भारताची ४ बाद २० अशी अवस्था केली. भारताची ही घसरण येथेच थांबली नाही. भरवशाचा फलंदाज म्हणून ख्याती असलेला रोहित शर्मा हादेखील जुनेदचीच शिकार ठरला. तिसऱ्या स्लीपमध्ये मोहम्मद हाफीझने त्याचा सुरेख झेल घेतला. निम्मा संघ अवघ्या २९ धावांमध्ये तंबूत गेल्यामुळे भारत १०० धावांचाही पल्ला गाठणार नाही, अशी स्थिती होती.
फलंदाजीचा फॉर्म संपला अशी टीका होत असलेल्या धोनीने आजही जबाबदारीने संघाचा डाव सावरला. त्याने संयमी खेळ करीत आक्रमक खेळाबद्दल ख्याती असलेल्या रैनाला अधिकाधिक संधी दिली. त्यांनी २३.५ षटकांत ७३ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी मिसबाह याने अनेक वेळा गोलंदाजीत बदल केले. तथापि, त्यास दाद न देता या जोडीने संघाचे शतक पूर्ण केले. ३४व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूंवर रैनाचा हाफीझने त्रिफळा उडविला. रैनाने ८८ चेंडूंमध्ये दोन चौकारांसह ४३ धावा केल्या.
रैनाच्या जागी आलेल्या अश्विनने संघातील प्रमुख फलंदाजांना कसे खेळावे, याचाच धडा शिकवीत धोनीला सुरेख साथ दिली. धोनी याने सर्वोत्तम फलंदाजीचा धडा गिरविताना सहजसुंदर खेळी केली. पहिला चौकार मारण्यासाठी त्याला ७९ चेंडूंची वाट पाहावी लागली, यावरून त्याच्या संयमी खेळाचा प्रत्यय येऊ शकेल. त्याने अश्विनच्या साथीत शेवटच्या पाच षटकांमध्ये ५२ धावा टोलविल्या. धोनी याने ४९व्या षटकांत इरफानच्या गोलंदाजीवर तीन चौकार व एक षटकार अशी आतषबाजी करीत वनडेमधील स्वत:चे सातवे शतकही पूर्ण केले. त्याने १२५ चेंडूंमध्ये नाबाद ११३ धावा करताना सात चौकार व तीन षटकार अशी फटकेबाजी केली. धोनीची ही संयमी खेळीच त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गेली. अश्विनने दोन चौकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. या दोघांनी १६.४ षटकांत १२५ धावांची अखंडित भागीदारी केली. भारताच्या डावात फक्त चारच षटकांत दोन आकडी धावा भारताला करता आल्या. यावरून पाकिस्तानच्या गोलंदाजीचे किती दडपण भारतीय फलंदाजांनी घेतले होते, याची कल्पना येऊ शकेल. पाकिस्तानकडून जुनेदने ४३ धावांमध्ये चार बळी मिळवले.
पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर हाफीझचा त्रिफळा उडविला. पाठोपाठ त्याने अजहर अली याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. या वेळी पाकिस्तानची २ बाद २१ अशी स्थिती होती, मात्र नंतर नासिर जमशेद व युनुस खान यांनी जबाबदारीने खेळ करीत खेळपट्टीवर कसे आत्मविश्वासाने खेळावयाचे याचा प्रत्यय घडविला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी षटकामागे चार धावांचा वेग ठेवीत १२१ चेंडूंमध्ये ११२ धावांची भागीदारी केली. अशोक दिंडाच्या गोलंदाजीवर अश्विनने युनुसचा सुरेख झेल घेतला. युनुसने भारताविरुद्ध खेळणारा हुकमी फलंदाज या बिरुदावलीला साजेसा खेळ करीत ६० चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक षटकार व तीन चौकार अशी फटकेबाजी केली.
युनुसनंतर आलेल्या कर्णधार मिसबाह उल हक याच्या साथीत जमशेदने पाकिस्तानला विजयाच्या दिशेने कूच करण्यात यश मिळविले. त्यातच त्याला युवराजकडून ६८ धावांवर जीवदान लाभले. जमशेद व मिसबाह यांनी ३९ धावांची भर घातली नाही तोच इशांत शर्माने मिसबाहचा १६ धावांवर त्रिफळा उडविला. मिसबाहच्या जागी आलेल्या शोएब मलिकने जमशेदला चांगली साथ दिली. त्यांनी ९.५ षटकांमध्ये ५६ धावांची अखंडित भागीदारी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये जमशेदने वनडेमधील पहिलेच शतकही पूर्ण केले. त्याने १३२ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावा करताना पाच चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. मलिकने ३५ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर तो यष्टीमागे झेलबाद झाला होता, मात्र तो ‘नोबॉल’ ठरल्यामुळे मलिक नशीबवान ठरला. मलिकने दिंडाला चौकार लगावून विजयी धाव घेतली.
धावफलक
भारत :
गौतम गंभीर त्रि. गो. इरफान ८, वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. जुनेद ४, विराट कोहली त्रि. गो. जुनेद ०, युवराज सिंग त्रि. गो. जुनेद २, रोहित शर्मा झे. हाफीझ गो. जुनेद ४, सुरेश रैना त्रि. गो. हफीझ ४३, महेंद्रसिंग धोनी नाबाद ११३, रवीचंद्रन अश्विन नाबाद ३१, अवांतर- (लेगबाइज-११ , वाइड-९, नोबॉल-२) २२, एकूण- ५० षटकांत ६ बाद २२७
बाद क्रम : १-१७, २-१७, ३-१९, ४-२०, ५-२९, ६-१०२.
गोलंदाजी : मोहम्मद इरफान ९-२-५८-१, जुनेद खान ९-१-४३-४, उमर गुल ८-०-३८-०, सईद अजमल १०-१-४२-०, मोहम्मद हाफीझ १०-२-२६-१, शोएब मलिक ४-०-९-०.
पाकिस्तान- मोहम्मद हाफीझ त्रि. गो. भुवनेश्वर ०, नासिर जमशेद नाबाद १०१, अजहर अली झे. रोहित गो. भुवनेश्वर ९, युनुस खान झे. अश्विन गो. दिंडा ५८, मिसबाह उल हक त्रि. गो. इशांत १६, शोएब मलिक नाबाद ३४, अवांतर- (लेगबाइज-६, वाइड-३, नोबॉल-१) १०, एकूण- ४८.१ षटकांत ४ बाद २२८.
बाद क्रम : १-०, २-२१, ३-१३३, ४-१७२.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-३-२७-२, इशांत शर्मा १०-०-३९-१, अशोक दिंडा ९-१-४५-१, रवीचंद्रन अश्विन १०-०-३४-०, युवराज सिंग ५-०-३३-०, सुरेश रैना २.१-०-२३-०, विराट कोहली २.५-०-२१-०.
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी
खेळपट्टीबाबत बाऊ करण्यासारखी स्थिती नव्हती. अनुभवी फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अन्यथा हा सामना आम्ही निश्चितचजिंकला असता. माझी निराशा झाली, ती अव्वल दर्जाच्या फलंदाजांनी केलेल्या बेभरवशी खेळीमुळेच. जुनेद खानने पहिल्या स्पेलमध्ये सुरेखच गोलंदाजी केली. मात्र जरा आत्मविश्वास त्यांनी दाखविला असता तर आम्ही ही पडझड रोखू शकलो असतो. आम्हाला २०-२५ धावा कमी पडल्या.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार
जुनेद खानच्या प्रभावी माऱ्यामुळे आम्ही भारताचा निम्मा संघ अवघ्या २९ धावांमध्ये तंबूत धाडला. तेथेच सामना जिंकण्याची खात्री झाली होती. २५० धावा करणे कठीण असल्यामुळे भारताची पहिली फळी लवकर तंबूत धाडल्यानंतर आमचे काम सोपे झाले. नासीर जमशेदने एका बाजूने झुंजार खेळ केला. त्यामुळे सुरुवातीला दोन विकेट्स गमावल्यानंतरही आमचा डाव गडगडला नाही.
– मिसबाह उल हक, पाकिस्तानचा कर्णधार
..आणि सूर्यदेव हसला!
चेन्नईत गेले आठ दिवस ढगाळ हवामान होते. अधूनमधून पावसाच्या सरी होत होत्या. त्यातच शुक्रवार व शनिवारीही पाऊस झाल्यामुळे येथे सामना होणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. पण रविवारी सूर्यदेव हसला आणि त्याने दर्शन दिल्यामुळे प्रेक्षकांना खेळाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली.
सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासठी प्रेक्षकांनी सकाळी सहापासूनच स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ रांगा लावल्या होत्या. चेपॉक परिसरातील वातावरण क्रिकेटमय झाले होते. भारताचा ध्वज (साधारणपणे ८० ते १०० रुपये), हाताला बांधायचा तिरंगी पट्टा (२० ते ३० रुपये), डोक्याला बांधायची तिरंगी पट्टी (२५ ते ३० रुपये) आदी अनेक वस्तूंची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरू होती आणि तेही चढय़ा भावानेच. चेहऱ्यावर भारत व पाकिस्तानच्या ध्वज रेखाटण्यासाठी लोकांनी भरपूर उत्सुकता दाखविली. काही प्रेक्षकांनी पुढच्या बाजूला भारताचा ध्वज, तर मागील बाजूस पाकिस्तानचा ध्वज असा जर्सी घालून आपली खिलाडूवृत्ती दाखवून दिली. रविवारची सुट्टी असल्यामुळे प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. स्टेडियममध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.