1st T20 match between India and West Indies will be played: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना खेळला जामार आहे. या मैदानावर २००९ मध्ये पहिला टी-२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले गेले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामनाही याच मैदानावर खेळला गेला होता ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती.
ब्रायन लारा स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?
क्वीन्स पार्क ओव्हलची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे धावा काढण्यासाठी फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. कारण ही खेळपट्टी अतिशय संथ आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना अतिरिक्त मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी ११५ धावा आहेत, तर दुसऱ्या डावात धावांची सरासरी ११२ आहे. येथे आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही.
क्वीन्स पार्क स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजचे रेकॉर्ड –
ब्रायन लारा स्टेडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क मैदानावर भारतीय संघाने केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. या सामन्यात भारताने १६ धावांच्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने या मैदानावर एकूण ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानी २ जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत.
टी-२० मध्ये कोणाचे वर्चस्व राहिले आहे?
भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत २५ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १७ सामने भारताने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने ७ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. शेवटच्या वेळी २०२२ मध्ये उभय संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती. ती भारताने ३-१ने जिंकली होती. भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या ७ पैकी ४ सामने जिंकले आणि ३ पराभूत झाले.