भारताच्या अथक प्रयत्नानंतरही अंधुक प्रकाशाच्या मदतीने पहिली कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेच्या संघाला यश आलं. दुसऱ्या डावात भारताने दिलेल्या २३१ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था दयनीय झाली होती. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ पुरता कोलमडला. ७ गडी माघारी गेल्यानंतर भारतीय संघानेही लंकेच्या उर्वरित फलंदाजांना माघारी धाडण्यासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण लावलं. मात्र तोपर्यंत श्रीलंकेच्या फलंदाजांनी पंचांकडे अंधुक प्रकाशाबद्दल तक्रार करायला सुरुवात केली होती. अखेर दोनही संघातील खेळाडूंच्या सहमतीने पंच नायजेल लाँग आणि जोएल विल्सन यांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
त्याआधी दुसऱ्या डावात विराट कोहलीने १०४ धावांची शतकी खेळी करत सामना रंगतदार अवस्थेत आणून ठेवला. या खेळीदरम्यान विराट कोहलीने ५ विक्रम आपल्या नावावर केले.
१ – कसोटीतील एका डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. ही किमया साधणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचं स्थान १८ वं आहे.
२ – एका वर्षात ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर.
एका वर्षात ५० पेक्षा जास्त धावा करणारे भारताचे कर्णधार –
राहुल द्रविड (२००६) – १९ वेळा
विराट कोहली* (२०१७) – १८ वेळा
सौरव गांगुली (२००२) – १७ वेळा
४ – एका वर्षात ९ शतकं ठोकणारा विराट कोहली चौथा कर्णधार ठरला आहे. याआधी रिकी पाँटींगने रिकी पाँटींगने २००५ आणि २००६ साली तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅम स्मिथने २००५ साली हा कारनामा केला होता.
७ – ५० किंवा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकणारा विराट कोहली हा सातवा फलंदाज ठरला आहे.
कोण आहेत उर्वरित सहा फलंदाज ? –
सचिन तेंडुलकर – १००
रिकी पाँटींग – ७१
कुमार संगकारा – ६३
जॅक कॅलिज – ६२
महेला जयवर्धने आणि हाशिम आमला – ५४
ब्रायन लारा – ५३
११ – कर्णधार या नात्याने वन-डे आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी विराट कोहलीची बरोबरी. सुनिल गावसकर यांच्या नावावरही कर्णधार म्हणून ११ शतकांची नोंद आहे. याव्यतिरीक्त मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनुक्रमे ९ आणि ७ शतकं जमा आहेत.
१७ – श्रीलंकेच्या दोन्ही डावात मिळून पडलेल्या १७ विकेट या भारतीय जलदगती गोलंदाजांनी घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांसाठी ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. याचसोबत पहिल्यांदाच भारताच्या फिरकीपटूंना एखाद्या कसोटी सामन्यात एकही विकेट मिळवता आलेली नाहीये.